मुंबई : शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाच्या समर्थनार्थ तयार करण्यात आलेली साडेचार हजारांहून अधिक बनावट प्रतिज्ञापत्रे जप्त केल्यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने याप्रकरणी तपासाला सुरूवात केली आहे. याप्रकरणी लवकरच काही जणांचे जबाब नोंदवण्यात येणार आहेत. निर्मल नगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले होते.

हेही वाचा >>> अंबानी धमकी प्रकरणः आरोपीची मानसिक स्थिती ठीक नसल्याचा दावा

पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्हावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगासमोर ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांना प्रतिज्ञापत्रे सादर करायची होती. उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ ही बनावट शपथपत्रे तयार करण्यात आल्याचा आरोप आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांना चार हजार ६८२ बनावट प्रतिज्ञापत्रे सापडली असल्याचे कळते आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

एका नोटरीकडून शनिवारी प्रतिज्ञापत्रे जप्त करण्यात आली. या प्रकरणातील तक्रारदार हे वांद्रे न्यायालयात गेले असताना त्यांना दोन व्यक्तींजवळ प्रतिज्ञापत्रांचा ढीग दिसला. त्यावर नोटरीचा शिक्का मारण्यात येत होता. त्याने त्याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करून सर्व प्रतिज्ञापत्रे ताब्यात घेतली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा >>> ‘बाळासाहेबांची शिवसेना’ नाव मिळाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

गुन्हे शाखा प्रतिज्ञापत्रात नाव असलेल्या व्यक्तींची पडताळणी करणार आहे. संबंधीत व्यक्ती अस्तित्त्वात आहे का, संबंधीत व्यक्तींच्या संमतीने संबंधीत प्रतिज्ञापत्र तयार करण्यात आले का, या गोष्टींची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच या प्रतिज्ञापत्राशी संबंधीत व्यक्तींचे जबाब नोंदवण्यात येणार आहेत. त्यासाठी काही व्यक्तींना कागदोपत्री पुरावे व नोंदी घेऊन बोलवण्यात आले आहेत.