मुंबईतल्या माटुंगा भागात असलेलं कॅफे मैसूर या ठिकाणी मालकाला स्पेशल २६ या सिनेमात दाखवल्याप्रमाणे लुटण्यात आलं. २५ लाखांना त्याला लुबाडलं गेलं. या प्रकरणात सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींनी स्पेशल २६ सिनेमाप्रमाणेच कट रचला होता. माटुंग्यातल्या किंग्ज सर्कल भागात हा कॅफे आहे. दाक्षिणात्य पदार्थांसाठी हा कॅफे ओळखला जातो. दाक्षिणात्य पदार्थ खाण्यासाठी खवय्यांचे पाय या कॅफेकडे कायमच वळतात. याच कॅफेच्या मालकाच्या घरी दरोडा टाकण्यात आला.
पोलिसांनी नेमकं काय म्हटलं आहे?
“स्पेशल २६ सिनेमाप्रमाणेच आरोपींनी लुटीचा कट रचला होता. बाबासाहेब भागवत, दिनकर साळवे, वसंत नाईक, शाम गायकवाड, नीरज खंडागळे, सागर रेडेकर” असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. या टोळीत काही सेवानिवृत्त पोलिसांचा सहभाग असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. न्यायालयाने या सात आरोपींना सात दिवासांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
“आई मी चोर पकडला”, चोराला रंगेहात पकडताच तरुणाने केले असे काही की…; VIDEO पाहून हसून व्हाल लोटपोट
स्पेशल २६ पाहून रचला कट
स्पेशल २६ हा सिनेमा पाहून त्यात दाखवण्यात आलेल्या एका सीनप्रमाणे आरोपींनी निवडणुकीच्या काळात चोरीचा कट रचला होता. यातला आरोपी वसंत नाईकला कॅफे मैसूरमधू काढण्यात आलं होतं. वसंत नाईक हा आरोपी मालकाच्या निकटवर्तीयांपैकी एक होता. त्यामुळे मालकाच्या घरात रोज येणाऱ्या पैशांची माहिती त्याला होती. मालकाने आपल्याला कामावरुन काढलं याचा राग त्याने मनात ठेवला होता. हाच राग मनात ठेवून त्याने लुटीचा कट रचला. कॅफे मैसूरच्या मालकाच्या घरी रोख रक्कम असते ही माहिती त्याने त्याच्या साथीदारांना सांगितली आणि स्पेशल २६ सिनेमाप्रमाणे कट रचला. त्याच्या साथीदारांनाही हा कट आवडला होता. त्यामुळे तेदेखील या लुटीसाठी तयार झाले.
चोरी नेमकी कशी केली?
कॅफे मैसूरच्या मालकाच्या घरी मोठी रक्कम आली की ती लुटण्यासाठी अधिकारी बनून जायचं आणि रक्कम लुटायची असा कट या सगळ्यांनी रचला होता. वसंत नाईकला कॅफे मैसूरच्या मालकाच्या घरी २० कोटी रुपये आहेत ही माहिती मिळाली. त्यानंतर त्याने आणि त्याच्या साथीदारांनी १३ मे च्या दिवशी दुपारी चार वाजता एक बनावट पोलीस व्हॅन आणि खासगी कार कॅफे मैसूरच्या मालकाच्या घरासमोर उभी केली. बनावट पोलीस ओळख पत्र दाखवलं आणि आम्ही गुन्हे शाखेचे अधिकारी आहोत तुमच्या घरात निवडणुकीसाठी आलेली रोख रक्कम आहे अशी टीप मिळाल्याचं त्यांनी सांगितलं आणि घराची झडती घेतली. यामध्ये २५ लाख रुपयांची रोख रक्कम मिळाल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. तसंच गुन्हा दाखल न करण्याच्या अटीवर २५ लाख रुपये घेऊन तिथून पसार झाले. मात्र पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला आहे. तसंच मुख्य आरोपीसह सहा जणांना अटक केली. फ्री प्रेस जर्नलने यासंबंधीचं वृत्त दिलं आहे.