Mumbai Crime : मुंबई सत्र न्यायालयाने बलात्काराचा आरोप असलेल्या एका माणसाला जामीन मंजूर केला आहे. ४६ वर्षीय माणसाने २९ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप होता. मात्र मुंबई सत्र न्यायालयाने या माणसाला जामीन मंजूर केला आहे. याचं कारण या माणसाने लिव्ह इनचा करार आणि इतर सात करार कोर्टात सादर केले होते. मुंबईतल्या कुलाबा भागात ही घटना ( Mumbai Crime ) घडली आहे.
पोलिसांनी नेमकं काय म्हटलं आहे?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर माणसाने आणि त्याच्या लिव्ह इन पार्टनरने एक करार केला होता. लिव्ह इनचा करार असं नाव त्याला दिलं. हा करार ११ महिन्यांसाठी ( Mumbai Crime ) करण्यात आला होता. ज्यावर त्या माणसाच्या आणि ज्या मुलीने त्या तक्रार केली तिच्या सह्या होत्या. दुसरीकडे महिलेच्या वकिलांनी हा दावा केला आहे की सदर सह्या या पीडितेच्या नव्हत्या. मात्र करार पाहिल्यानंतर सत्र न्यायलायने सदर आरोपीला जामीन मंजूर केला आहे.
लग्नाचं आमिष देऊन बलात्कार केल्याचा आरोप
सदर प्रकरणातला ( Mumbai Crime ) आरोपी हा सरकारी कर्मचारी आहे. तर २९ वर्षांची ही महिला वृद्धांची केअरटेकर म्हणून काम करते. आरोपीने महिलेला लग्नाचं वचन दिलं आणि तिच्यावर वारंवार बलात्कार केला, असं या महिलेने पोलिसांना सांगितलं. तसंच प्रत्येक वेळी तो लग्नाचा विषय टाळत होता असंही या महिलेने सांगितल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं. या महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तिची आणि आरोपीची ओळख ऑक्टोबर २०२३ मध्ये झाली. आपण सरकारी कर्मचारी आहोत असं आरोपीने तिला सांगितलं. तर मला एक मुलगा आहे आणि घटस्फोटित आहे असं या महिलेने त्याला सांगितलं. आमची ओळख झाल्यानंतर मैत्री वाढली. त्यानंतर एके दिवशी आरोपीने महिलेशी सहमतीने शरीरसंबंध ठेवले, त्याने लग्नाचं वचन देऊन संबंध ठेवल्याचं महिलेने ( Mumbai Crime ) पोलिसांना सांगितलं. यानंतर हे दोघंही फोनवरुन संपर्कात होते. काही दिवसांनी आरोपीने आपल्याला मित्रांसह अलिबागला येशील का? अशी विचारणा केली. मी त्याच्या बरोबर अलिबागला गेले होते, तिथेही शरीर संबंध प्रस्थापित झाले असंही या महिलेने पोलिसांना सांगितलं.
ब्लॅकमेलिंगचा आरोप
या महिलेने सांगितलं, आमच्या भेटीगाठी वाढल्यानंतर आरोपीने मला सांगितलं की माझ्याकडे तुझे काही असे फोटो आहेत जे आक्षेपार्ह आहेत, आता जे झालं ते झालं तू मला भेटायचं थांबव नाहीतर मी फोटो सोशल मीडियावर पोस्ट करेन असं त्याने सांगितल्याचं महिलेने ( Mumbai Crime ) सांगितलं. तसंच ही महिला म्हणाली, मी त्याच्याशी शरीरसंबंध ठेवल्याने गरोदर राहिले ही बाब जेव्हा त्याला सांगितली तेव्हा तू गर्भनिरोधक गोळ्या घे असं त्याने मला सांगितलं. तसंच तो ब्लॅकमेल करत होता असा आरोप महिलेने केला आहे.
जानेवारी महिन्यात काय घडलं?
महिला पुढे म्हणाली, जानेवारी महिन्यात त्याने मला फोन केला आणि घरी भेटायला बोलवलं. सुरुवातीला मी जायला तयार नव्हते. पण जेव्हा मी त्याच्या घरी गेले तेव्हा मी तिथे पाहिलं की त्याची पत्नी तिथे आहेत. त्यावेळी मला जाणीव झाली की आरोपीने माझी फसवणूक ( Mumbai Crime ) केली आहे. लग्नाचं वचन देऊन मला फसवलं आहे. यानंतर २३ ऑगस्टला मी पोलिसात तक्रार केली. मात्र आरोपीने सत्र न्यायलयात धाव घेतली लिव्ह इनचा सात अटी असलेला करार दाखवला आणि जामीन ( Mumbai Crime ) मिळवला. मिड-डे ने हे वृत्त दिलं आहे.
हे पण वाचा- महिला सुरक्षेसाठी सरकारने लाँच केलेलं ‘SHE-Box Portal’ काय आहे? महिलांना याची कशी मदत होईल?
लिव्ह इनच्या करारामधल्या अटी काय?
१) या करारानुसार १ ऑगस्ट २०२४ ते ३० जून २०२५ या कालावधीत दोघंही सहमतीने लिव्ह इन मध्ये राहू
२) या कालावधीत कुणीही एकमेकांच्या विरोधात लैंगिक छळ, बलात्कार याची तक्रार करणार नाही. दोघंही शांतपणे हा वेळ घालवतील
३) महिला पुरुषाच्या घरी जाऊन राहू शकते, पण तिचं वागणं विचित्र किंवा वेगळं वाटलं तर ते एक महिन्याची नोटीस एकमेकांना देऊन वेगळे होऊ शकतात.
४) दोघंही एकत्र राहात असताना महिलेच्या नातेवाईकांनी पुरुषाच्या घरी भेट द्यायला येऊ नये.
५) पाचव्या अटीनुसार महिलेने पुरुषाच्या विरोधात कुठल्याही छळाची किंवा मानसिक छळाची तक्रार या कराराच्या कालावधीत देऊ नये.
६) शरीरसंबंध प्रस्थापित झाल्यानंतर महिला गरोदर राहिली तर त्याची जबाबदारी पुरुषाची नाही तर महिलेचीच असेल.
७) महिलेने छळ करण्याचा प्रयत्न केला, आरोप केले, त्यामुळे पुरुषाच्या आयुष्यात काही घडलं तर त्याची जबाबदारी तिची असेल.
आरोपीचे वकील काय म्हणाले?
अशा सात अटींचा करार या दोघांनी केल्याचं सदर प्रकरणात आरोपीने सांगितलं. हा करारही न्यायालयात सादर केला. ज्यानंतर बलात्काराचा आरोप असलेल्या आरोपीला मुंबई सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. याबाबत आरोपीचे वकील म्हणाले की माझ्या अशीलाला या प्रकरणात अडकवण्यात आलं आहे. सदर तक्रारदार महिला आणि माझे अशील सहमतीने लिव्ह इनमध्ये राहात होते. त्यांच्यातला करारच सगळं सांगून जातो आहे.
पोलीस निरीक्षक ज्योती दामलेंनी प्रकरणाबाबत काय म्हटलं आहे?
कुलाबा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ज्योती दामले म्हणाल्या की माझ्या इतक्या वर्षांच्या सेवेत लिव्ह इन रिलेशनशिपची हे पहिलंच प्रकरण मी पाहते आहे. सत्र न्यायालयाने या प्रकरणात आरोपीला जामीन मंजूर केला आहे. त्यांनी लिव्ह इनचा करार दाखवला आहे. आम्ही त्या कराराची शहानिशा करत आहोत. आम्हाला असा काही करार झाला होता याची माहिती आधी मिळाली नाही.
© IE Online Media Services (P) Ltd