Mumbai Crime : मुंबईतल्या एका आंतरराष्ट्रीय दर्जा असलेल्या शाळेत अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या मुलीचा मृतदेह शाळेच्या प्रसाधनगृहात आढळून आला अशी माहिती पोलिसांनी दिली. ही मुलगी ११ वीला शिकत होती. तिने बुटाच्या नाडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी ही माहिती दिली. या प्रकरणात आरे पोलीस ठाण्यात आत्महत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
१६ वर्षांची मुलगी दोन महिन्यांपासून नैराश्यात
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार ११ वीत शिकणारी ही मुलगी गेल्या दोन महिन्यांपासून नैराश्यात गेली होती. ती नेहमीप्रमाणे शाळेत गेली. त्यानंतर तिचे कराटे क्लास सुरु असताना ती मुलगी प्रसाधनगृहात गेली. मात्र प्रसाधनगृहातून बराच वेळ झाला तरीही कराटे क्लासला आली नाही. शाळेत असलेल्या अटेंडंटनी प्रसाधनगृहात जावून पाहिलं तेव्हा प्रसाधनगृहाचं दार बंद आढळून आलं. त्यानंतर प्रसाधनगृहाचा दरवाजा तोडण्यात आला. ज्यावेळी ही मुलगी गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आली.
डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केलं
यानंतर शाळा प्रशासनाने तातडीने या मुलीला रुग्णालयात नेलं मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. या मुलीच्या पालकांनी कुठलाही संशय व्यक्त केलेला नाही. अपघाती मृत्यूची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे अशी माहिती रवींद्र पाटील यांनी दिली.
अकरावीत शिकणारी १६ वर्षीय विद्यार्थिनी शाळेत गेली आणि नेहमीप्रमाणे तिच्या तासाला उपस्थित राहिली. काही वेळानंतर ही विद्यार्थिनी शाळेच्या वॉशरुममध्ये गेली आणि तिच्या बुटाच्या लेसने गळफास घेऊन तिने आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि वेगानं तपास सुरू केला. घटनास्थळावर करण्यात आलेल्या तपासात पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही. पोलिसांनी मृत विद्यार्थिनीच्या पालकांना कोणावर संशय आहे का? या घटनेबद्दल विचारले असता, पालकांनी कोणावरही संशय नसल्याचे सांगितलं. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.