Mumbai Crime : पत्नीचं अफेअर सुरु आहे या संशयातून तिची हत्या करणाऱ्या पतीला मुंबई सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. २०२० मध्ये दीनेश परशुराम मोरे या आरोपीने त्याच्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरुन तिची हत्या केली. ही घटना मुंबईतील मालाड या ठिकाणी असलेल्या कुरारमध्ये घडली होती.
दीनेश मोरे दोषी असल्याचा निर्णय २०२० मध्येच दिला गेला
दीनेश मोरे हा पत्नीच्या हत्या प्रकरणात दोषी असल्याचा निर्णय २०२० मध्येच न्यायालयाने दिला होता. कलम ३०२ च्या अतंर्गत त्याला दोषी ठरवण्यात आलं. परिस्थितीजन्य पुरावे आणि इतर पुराव्यांच्या आधारे दिनेशला दोषी ठरवण्यात आलं होतं. या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने दीनेशला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात न्यायालयाने निरीक्षणही नोंदवलं आहे.
न्यायाधीश ढोबळे यांनी काय म्हटलं आहे?
अतिरिक्त सत्र न्यायाधीश दत्ता ढोबळे यांनी १० फेब्रुवारी रोजी या प्रकरणावर निकाल दिला. निकालाची प्रत बुधवारी उपलब्ध झाली. यात असं म्हणण्यात आलं आहे की दीनेशने केलेलं कृत्य हे दुर्मिळातलं दुर्मीळ नाही. त्यामुळे त्याला फाशीची शिक्षा देता येणार नाही. त्याने हत्या केली आहे त्यामुळे न्यायालय दीनेशला जन्मठेपेची शिक्षा सुनावत आहे असं म्हणत ढोबळे यांनी निर्णय दिला. दीनेशने धारदार शस्त्राने त्याच्या पत्नीची हत्या केली. दीनेशने केलेला खुनाचा गुन्हा गंभीरच आहे. मात्र त्याने योजना आखून किंवा कट रचून ही हत्या केलेली नाही. कौटुंबिक मतभेदांमुळे आणि पत्नीवर संशय असल्याच्या रागातून त्याने ही हत्या केली आहे. तसंच कोर्टाने असंही म्हटलं आहे की कुटुंबात कमाई करणारा तो एकमेव सदस्य आहे. त्याला अल्पवयीन मुलीही आहेत. त्यामुळे त्याला मृत्यूदंडाची शिक्षा न देता आम्ही जन्मठेपेची शिक्षा सुनावत आहोत.
नेमकी ही घटना काय?
दीनेशची पत्नी गृहसेविका म्हणून काही घरांमध्ये काम करत होती. मात्र पत्नीचे विवाहबाह्य संबंध आहेत असा संशय दीनेशला होता. यावरुन त्याने त्याच्या पत्नीला विचारणाही केली. या विषयावरुन दोघांमध्ये अनेकदा खटकेही उडत असत. आरोपी दीनेशला संशय होता की त्याच्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध आहेत. या सगळ्या संशयावरुन २७ फेब्रुवारी २०२० ला दीनेश मोरेने त्याच्या पत्नीची धारदार शस्त्राने हत्या केली. यासंबंधीचे पुरावे सादर केल्यानंतर दीनेश मोरेला न्यायालयाने दोषी ठरवलं आणि या प्रकरणात त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.