गाडय़ांची काच फोडून दार उघडत गाडीतील ऐवज चोरणाऱ्या टोळीला गावदेवी पोलिसांनी थरारक पाठलाग करून पकडण्याची कामगिरी केली आहे.
दक्षिण मुंबईतील चौपाटीजवळील सुखसागर हॉटेलच्या आसपास उभ्या केलेल्या गाडय़ातील ऐवज चोरीला गेल्याच्या तक्रारी गावदेवी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. चोऱ्या या रात्री साडेसात ते दहा वाजण्याच्याच दरम्यान झाल्याने पोलीसही संभ्रमात पडले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नेताजी भोपळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी श्यामराव पाटील यांनी माहिती घेतली असता, एकच टोळी या चोऱ्या करीत असल्याचे लक्षात आले. त्यातही टोळी एका गाडीतूनच येऊन झटपट पळून जात असल्याचेही लक्षात आले. हे पाहून पोलिसांनी या टोळीला पकडण्यासाठी सापळा रचण्याचे ठरविले.
पोलिसांनी हॉटेलजवळ गाडी उभी करीत त्यात एक लॅपटॉप बॅग ठेवली. रात्र झाल्यावर एक टॅक्सी संशयितपणे आणि अगदी धिम्या गतीने हॉटेल परिसरात येताना पोलिसांना दिसली. त्याच वेळी एक व्यक्ती उभ्या केलेल्या त्या गाडीजवळ आला.
त्याने आपली टोपी काढली आणि परत डोक्यावर ठेवली. हाच प्रकार त्याने एक-दोनदा केला. गाडीतच बसलेल्या चोरटय़ांनी गाडीची काच फोडून दरवाजा उघडला आणि गाडीतील लॅपटॉप बॅग उचलली. त्यावेळी पोलिसांनी पुढे सरसावत चोरटय़ांना थांबण्यास सांगितले. आपण पकडले जाणार हे लक्षात आल्यावर चोरटय़ांनी गाडी पळविण्यास सुरुवात केली.
पोलिसांनीही गाडय़ा काढत त्यांचा पाठलाग सुरू केला. ऐन वाहतूक कोंडीत सुसाट गाडी चालवणाऱ्या या चोरटय़ांचा पाठलाग करणे पोलिसांना अवघड होऊ लागले. त्यांनी दोन दुचाकीस्वारांना मदतीला घेऊन पाठलाग केला आणि ऑगस्ट क्रांती मैदान येथे या चोरटय़ांना अडवले. गणेश पवार आणि संतोष काळे यांना पोलिसांनी अटक केले तर टॅक्सीचालक पळून गेला.
पोलिसांच्या चौकशीत गणेश पवार हा सराईत गुन्हेगार असल्याचे स्पष्ट झाले. गणेश कारमधील टेप, बॅग, जे असेल ते घेऊन पळ काढत असे, गाडीतूनच येऊन ज्या गाडीतील ऐवज चोरायचा आहे, त्याच्या बाजूला गाडी उभी केल्याने पादचाऱ्यांनाही कुठलाच संशय येत नसे, पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्याला पकडण्यात पोलिसांना यश मिळाले. त्याच्यावर आतापर्यंत ४२ गुन्हे दाखल असून घरफोडय़ा, चोऱ्या यात त्याचा हातखंडा असल्याचेही स्पष्ट झाले. हवालदार सुनील कदम, संग्राम अतिग्रे, प्रमोद वाडते यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली. चोरटय़ांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा