मुंबईत नोकराने मालकीणीला शॉक दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जेवण योग्य नसल्याची तक्रार मालकीणीनं केली होती. यानंतर नोकराने मालकीणीला मारहाण करत जीवघेणा हल्ला केला आहे. याप्रकरणी नोकराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंधेरी पश्चिम येथील रॉयल क्लासिक इमारतीत रविवारी ( १७ सप्टेंबर ) ही घटना घडली आहे. २५ वर्षीय नोकर दोन वर्षापासून ४५ वर्षीय महिलेच्या घरी जेवण बनवण्याचं काम करत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
रविवारी दुपारी नोकराने जेवण तयार केलं होतं. यावरून मालकीणीनं जेवण योग्य नसल्याचं म्हणत नोकराला सुनावलं. तसेच, घरी निघून जाण्यास सांगितलं. याचा राग मनात धरून नोकराने मालकीणीला मारहाण करण्यात सुरूवात केली. तिचा गळा दाबून डोक भिंतीवर आपटलं आणि विजेचा शॉक दिला.
हेही वाचा : २० ते २५ जण बॉम्ब तयार करत असल्याची खोटी माहिती, मद्यपी पोलिसांच्या ताब्यात
या हल्ल्यात ४५ वर्षीय महिला गंभीर जखमी झाली आहे. महिलेला ट्रॉमा केअर रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिच्यावर उपचार सुरु असून, प्रकृती स्थिर आहे. मात्र, या धक्कातून अद्यापही महिला सावरली नाही.
हेही वाचा : अंडरवर्ल्डच्या मदतीने पाकिस्तानातही बेटींग अॅप; पाकिस्तान पाठवलेल्या रकमेबाबत ईडीकडून तपास
“कलम ३०८ नुसार ( हत्येचा प्रयत्न ) आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीची ओळख पटली अधिक तपास सुरू आहे,” असं एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं. ‘मिड डे’ने याबाबत वृत्त दिलं आहे.