मुंबई : जुहू चौपाटी येथे अंगावर आलेल्या कुत्र्याला हाकलल्याच्या रागातून २६ वर्षीय तरूणाचा अंगठा कापल्याचा प्रकार घडला आहे. आरोपीने तक्रारदावर चाकूने वार केले असून जुहू पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
तक्रारदार अर्जुन कैलास गिरी (२६) त्यांचा मित्र रामसिंह राजपूत यांच्यासह रविवारी जुहू चौपाटीवर गेले होते. चौपाटीवर फिरल्यानंतर घरी जात असताना बिर्ला लेन येथे खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या या टपरीवरील कुत्रा भुंकत गिरी यांच्या अंगावर आला. या प्रकाराने घाबरलेल्या गिरी यांनी शेजारी असलेली खुर्ची उचलली व कुत्र्याला हाकलण्याचा प्रयत्न केला. गिरी कुत्र्याला हाकलवत असल्याचा राग तेथील एका अनोळखी व्यक्तीला व त्याने गिरी यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की करण्यास सुरूवात केली. त्यानंतर आरोपी व्यक्ती खाद्यपदार्थ टपरीवर गेली. तेथून एक चाकू उचलून आरोपीने गिरी यांच्यावर सपासप वार करण्यास सुरूवात केली. त्यात त्यांच्या डाव्या हाताचा अंगठा अर्धा कापला गेला. घटनेनंतर गिरी यांना कूपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यावेळी गिरी यांनी जबाबात घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर जुहू पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १०९, ३५२ शस्त्र अधिनियम ४ व २५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणानंतर पोलिसांनी तात्काळ पथक पाठवून आरोपी तरूणाला अटक केली. ओमकार मनोहर मुखिया ऊर्फ ओमकार शर्मा अशी आरोपीची ओळख पटली आहे. २५ वर्षाचा आरोपी केटरिंग संबंधीत छोटी-मोठी काम करतो.
हल्ल्यात गिरी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या डाव्या बोटाचा अंगठा अर्धवट कापला आहे. याशिवाय पोटात डाव्या बाजूला, डोक्याच्या मागे, डाव्या हाताला दंडावर, पाठीवर व दोन्ही हातावर चाकूच्या जखमा आहेत. सध्या त्यांना कुपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची स्थिती स्थीर असल्याचे पोलिसांनी सांगितले. हल्ल्यानंतर आरोपी ओमकारला रविवारी रात्री अटक करण्यात आली आहे. आरोपीने हल्ल्यात वापरलेला चाकू अद्याप सापडला नसून त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी ओमकार याच्याविरोधात यापूर्वी एकही गुन्हा दाखल नाही. कुत्र्याला हाकलल्यामुळे रागात त्याने हा प्रकार केल्याचे सांगितले आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.