मुंबई-नाशिक महामार्गावर आटगाव जवळ स्कॉर्पिओ गाडीचे चाक पंक्चर झाल्याने गाडी थांबवताच जंगालात दबा धरून बसलेल्या पाच लुटारुंनी गाडीतील व्यक्तींना चाकूचा धाक दाखवत रोख रकमेसह तब्बल तीन लाखांचे सोन्याचे दागिने लुटुन पोबारा केला. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली.
कल्याण-तीसगाव येथील अहिरे, जगताप व गवारे कुटुंबिय सिन्नर येथे वास्तुशांतीच्या कार्यक्रमासाठी गेले होते. तेथून कल्याणकडे परतत असताना मध्यरात्री बाराच्या सुमारास ही घटना घडली़  या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात सोमवारी दुपारी पाच लुटारुंविरोधात दरोडय़ाचा गुन्हा दाखल करण्यात आला आह़े

सोनसाखळी चोराला अटक
ठाणे : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने सोनसाखळी खेचणाऱ्या चोरटय़ाला ठाणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केले. त्याचा अन्य एक साथिदार मात्र फरार आहे. कैलास पवार (२५) असे आरोपीचे नाव असून तो डहाणूतील राहणारा आहे. त्याने अन्य तीन ठिकाणी सोनसाखळी चोरी केल्याचे तपासात उघड झाले आहे. विक्रमगड ते वेहल पाडा रोडवर काही दिवसांपूर्वी स्वाती अतकर या महिलेला रस्त्यात अडवून अनोळखी मोटरसायकलस्वाराने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तिच्या गळ्यातील सुमारे ४५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र खेचून पळ काढला होता़  त्यानुसार ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राजेश प्रधान यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेला तपास करून या प्रकरणात कैलासला अटक केली़  

नेपाळी तरुणाची आत्महत्या
ठाणे : माजीवाडा भागात शनिवारी रमेश बिरेभान (२०) या नेपाळी तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली़  हॉटेल मालक मोनीश हटकर आणि दोन वेटर कामात चुका शोधून या तरुणास अपमानित करीत होते. यातूनच त्याने आत्महत्या केल्याची तक्रार रमेशची बहीण धर्मा देवकोटा यांनी दिली आहे. या प्रकरणी हॉटेलमालक आणि दोन वेटरना कापूरबावडी पोलिसांनी अटक केली आहे. या हॉटेलमध्ये तो एकटाच नेपाळी होता. तर उर्वरीत वेटर ओदिशाचे रहिवासी आहेत.

समलिंगी संबंधांसाठी बळजबरी केल्याने मित्राची हत्या
मुंबई : समलिंगी संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करणाऱ्या आपल्या मित्राला चाकूने भोसकून ठार मारणाऱ्या एका तरुणाला बांगूरनगर पोलिसांनी अटक केली. येथील एका नाल्यात एक मृतदेह सापडला. तपासाअंती हा मृतदेह वहाब अली जब्बार अली खान याचा असल्याचे समजले. हा टेम्पो चालकाचे काम करत असल्याची माहिती मिळाली. तसेच याच्या मोबाइलवरून एका मोबाइल क्रमांकावर सातत्याने फोन केल्याचे आढळले. हा क्रमांक शफीक मोहम्मद वकील खान असून तो वहाबचा टेम्पो घेऊन उत्तर प्रदेशात जात असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी शफिकला झाशी येथे अटक करून मुंबईत आणले. वहाब अली आणि आपण मित्र होतो. मात्र वहाब समलिंगी संबंध ठेवण्यासाठी आपल्यावर जबरदस्ती करत असल्याने त्याचा राग येऊन आपण त्याचा खून केल्याची कबुली शफीकने दिली.

कोरियाच्या नागरिकाला लुटले
मुंबई : सीएसटी परिसरात खिसेकापूंचा सुळसुळाट असतो, हे मुंबईकरांसाठी नवीन नाही. मात्र रविवारी याचा फटका दक्षिण कोरियातून मुंबईत पर्यटनासाठी आलेल्या चँग हून हो या ५८ वर्षीय पर्यटकाला बसला. या पर्यटकाचे पाकीट मारले गेल्याने त्याच्याजवळील ५ लाख ७० हजार मूल्याचे विदेशी चलन चोरीला गेले. रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास चँग हुतात्मा चौक परिसरातून सीएसटीकडे येत होते. रस्त्यावर फोटो काढत असताना एका अनोळखी इसमाने त्यांच्या पॅण्टमधून पाकीट चोरले. चँग यांच्या पाकिटात ४५०० अमेरिकन डॉलर आणि ५४०० दक्षिण कोरियन वोन एवढे विदेशी चलन होते. यांचे मूल्य ५ लाख ७० एवढे आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.

सराफाच्या दुकानावर दरोडा
मुंबई : चारकोप येथील सराफाच्या दुकानावर दरोडा टाकून तब्बल ४२ लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लुटून नेण्याची घटना शनिवारच्या मध्यरात्री घडली. या दरोडेखोरांनी कोणताही पुरावा मागे न सोडण्याचे ठरवत सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआरही (डीजीटल व्हिडिओ रेकॉर्डर) चोरून नेला. चारकोप बाजारातील कुणाल ज्वेलर्स या दुकानाचे मालक सत्यनारायण सोनी यांनी शनिवारी रात्री दहाच्या सुमारास दुकान बंद केले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या मित्राने त्यांना त्यांचे दुकान उघडे असल्याचे सांगितले. त्या वेळी दरोडा पडल्याचे त्यांना समजले. त्यानंतर त्यांनी तातडीने चारकोप पोलिसांत धाव घेत गुन्हा नोंदवला.

Story img Loader