मुंबई: काँग्रेसचे खासदार चंद्रकांत हंडोरे यांचा मुलगा गणेश हंडोरे मोटारगाडीने जात असताना शुक्रवारी रात्री चेंबूर परिसरात एका दुचाकीस्वराला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वारला इजा झाली असून याप्रकरणी गोवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून गणेश हंडोरे याला अटक केली.

चेंबूरमधील पी. एल. लोखंडे मार्गावर खासदार चंद्रकांत हंडोरे वास्तव्यास असून गणेशही त्यांच्यासोबत राहतो. गणेश शुक्रवारी मध्यरात्री १२ च्या सुमारास मोटारगाडीने फळांचा रस पिण्यासाठी चेंबूरमधील सुभाष नगर परिसरात गेला होता. यावेळी मोटारगाडीत गणेश आणि त्याचा लहान मुलगा होता. पुन्हा घरी परतत असताना आचार्य महाविद्यालय परिसरात त्याने एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गोपाळ आरोटे जखमी झाला. अपघातानंतर गणेशने तथेून पळ काढला. काही स्थानिक रहिवाशांनी जखमी गोपाळला तत्काळ चेंबूरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल केले.

हेही वाचा – मुंबई : वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करून संगणकाची तोडफोड, आरोपीला अटक

हेही वाचा – मुंबई : जयभीमनगर प्रकरण; झोपड्यांवर कारवाई करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करणार, राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती

या अपघाताची माहिती मिळताच गोवंडी पोलिसांनी गणेश हंडोरेविरोधात गुन्हा दाखल केला आणि शनिवारी सकाळी गणेशला अटक केली. मात्र अचानक गणेशची प्रकृती बिघडल्याने त्याला जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी गोवंडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Story img Loader