मुंबई: घाटकोपरमध्ये पूर्ववैमनस्यातून चौघांनी दोन तरुणांवर धारदार हत्याराने वार केले. या घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला असून गुन्हे शाखेने याप्रकरणी चार आरोपींना अटक करून घाटकोपर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले.
घाटकोपरच्या भटवाडी परिसरात राहणारा परेश गोटल (२८) याचा परिसरात राहणाऱ्या तरुणांसोबत काही महिन्यांपूर्वी वाद झाला होता. तो मंगळवारी रात्री परिसरातून जात असताना पुन्हा आरोपींसोबत त्याचा वाद झाला. यावेळी आरोपींनी त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याच्यावर धारदार चाकूने अनेक वार केले. त्याला वाचवण्यासाठी आलेल्या त्याच्या भावावरही आरोपींनी वार केले. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले. दोघांना तत्काळ राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वी परेशचा मृत्यू झाला. तर त्याच्या भावावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा – मुंबई : बनावट पावत्यांद्वारे कंपनीची पावणेदोन कोटींची फसवणूक
घटनेची माहिती मिळताच घाटकोपर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. गुन्हे शाखा युनिट ७ च्या अधिकाऱ्यांनीही याप्रकरणी समांतर तपास सुरू केला. आरोपींची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी विविध ठिकाणी छापा घालून काही तासांतच आरोपींना अटक केली. तौसीब अन्सारी (२५), करण शिंदे (२६), निखिल कांबळे (१९) आणि रोशन शिरमुल्ला (२६) अशी या आरोपींची नावे असून सर्वजण घाटकोपरमधील रहिवासी आहेत.
हेही वाचा – मुंबई विद्यापीठ शैक्षणिक विभागांसाठी नोव्हेंबरमध्ये क्रमवारी जाहीर करणार
सर्व आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरोधात घाटकोपर पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. गुन्हे शाखेने या आरोपींना अटक करून पुढील तपासासाठी घाटाकोपर पोलिसांच्या ताब्यात दिले असून घाटकोपर पोलीस अधिक तपास करीत आहेत.