आसाममधील एका २० वर्षीय मुलगा आणि १४ वर्षीय मुलगी प्रेमासाठी घरातून पळून गेले. मुलगी अल्पवयीन असल्याने या दोघांचा शोध घेणं महत्त्वाचं होतं. ते मुंबईत असल्याचं पोलिसांना समजले होते. पण बाकी काहीच सुगावा लागत नव्हता. त्यातच आंतरधर्मीय प्रकरण असल्याने त्यांच्या गावातील तणाव वाढत चालला होता. अशा वेळी कोंडीत सापडलेल्या आसाम पोलिसांच्या मदतीला मुंबई पोलीस धावून गेले.

१० मे २०१६. अंधेरीच्या तेली गल्लीच्या कोपऱ्यातील कार्यालयात मुंबई गुन्हे शाखा कक्ष ८ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ वाव्हळ यांना मुंबई गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक के.एम.प्रसन्ना यांनी फोन करून आसाममधून पळून मुंबईत आलेल्या एका प्रेमी युगुलाचा शोध घेण्याच्या सूचना केल्या. आसाममधील बिस्वनाथ जिल्ह्यातून एक २० वर्षीय तरुण १४ वर्षीय मुलीसोबत पळून आला होता. आंतरधर्मीय प्रेमप्रकरण असल्याने त्या भागात जातीय तणाव निर्माण झाला होता. परंतु, आसाम पोलिसांना या दोघांचाही ठावठिकाणा लागत नव्हता. अखेर त्यांनी या दोघांना शोधण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेला विनंती केली. प्रसन्ना यांच्या सूचना मिळताच वाव्हळ यांनी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गावशेते यांना बोलावून एक पथक तयार केलं.
अब्दुल शेख (२०) आणि मोना सरकार (१४) (नावे बदललेली) अशी या प्रेमवीरांची नावं. अब्दुलने नुकतेच पदवीचे शिक्षण पूर्ण केले होते आणि तो वडिलांच्या व्यवसायात मदत करू लागला होता. मोना ९वीत शिकत होती. ती अब्दुलच्याच परिसरात राहत होती. कोवळय़ा वयात पाऊल भरकटलं आणि ही दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. मोना अल्पवयीन आणि शाळकरी विद्यार्थिनी होतीे. परंतु अब्दुलच्या बोलण्याने भाळून ती त्याच्यासोबत घर सोडून पळून आली. १३ फेब्रुवारी २०१६ रोजी ते दोघे घरातून पळाले होते.
आसाम पोलिसांनी सर्वत्र शोध घेतल्यावर ते मुंबईला गेले आहेत एवढीच माहितीे मिळवलीे होती. कारण मोनाने एकदा आईला एका पीसीओमधून संपर्क साधला होता. हा दूरध्वनी अंधेरीतील चकाला भागातून आला होता. याच दुव्यावरून तपास करण्याचे मुंबई पोलिसांनी ठरवले. पोलिसांनी त्या पीसीओला भेट दिली. तिथे काही सीसीटीव्ही मिळतात का ते तपासलं. पण काही सीसीटीव्ही नव्हता. दूरध्वनी चालकाकडून माहिती मिळणं अशक्य होतं. त्या ठिकाणी एका इमारतीचे बांधकाम सुरू होते. पोलीस निरीक्षक वाव्हळ यांनी ती गोष्ट हेरली. उदरनिर्वाहासाठी बांधकाम सुरू असलेल्या साईटवर हे युगुल काम करत असेल, अशी शंका त्यांना आली. त्यांनी संबंधित बांधकामाच्या ठिकाणी ठेकेदाराकडे चौकशी केली असता, त्याने त्यांच्या शंकेवर शिक्कामोर्तब केले. परंतु, अब्दुल आणि मोना आता तेथे रहात नव्हते. पोलिसांना एक धागा तर मिळाला होता. त्यांनी मुंबईतील सगळय़ा बांधकामाच्या साइट पालथ्या घालायला सुरुवात केली. सुमारे ६०-७० बांधकामांच्या ठिकाणी भेटी दिल्या. पण हाती काहीच लागले नाही. तरीही पोलिसांनी धीर सोडला नाही.
दुसरीकडे शहरातील सगळे लॉज आणि हॉटेलमध्ये पोलिसांनी तपासणी सुरू केली होती. मुंबईत हजारोंच्या संख्यने लॉजेस आहेत. पोलिसांनी आपल्या खबऱ्यांचे नेटवर्क वापरले. पण दोघांचा पत्ता लागत नव्हता. देहविक्री करणारे रॅकेटसही पोलिसांनी धुंडाळले. कारण अल्पवयीन मुलीेंना प्रेमाच्या जाळ्यात ओढून नंतर मुंबईत देहविक्रीच्या धंद्यात नेले जात असते. पण तेथूनही काही मिळत नव्हते. अब्दुल सापडत नसल्याने आसाममध्ये तणाव कमालीचा वाढत होता. काही संघटनांनी राजकीय वळण दिले होते. त्यामुळे आसाम पोलीस कमालीच्या दबावाखाली होते.
याच दरम्यान, जोगेश्वरी पूर्वेच्या हरिनगर येथे बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीच्या ठिकाणी गुन्हे शाखेचे पथक पोहोचले. तेथून जवळच असलेल्या एका दुकानदाराला त्यांनी अब्दुल व मोनाची छायाचित्रे दाखवली. त्याने दोघांना लगेच ओळखले. हे दोघे सामान खरेदी करण्यासाठी आपल्या दुकानात येतात, हे त्याने सांगितले. पोलिसांनी क्षणाचाही वेळ न दवडता बांधकामाच्या ठिकाणी धाव घेऊन अब्दुल आणि मोनाला ताब्यात घेतले. मोनाची वैद्यकीय चाचणी घेतली. मुलगी अल्पवयीन असल्याने अब्दुलवर अपहरण आणि बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. दुसऱ्याच दिवशी दोघांना आसाममध्ये नेण्यात आले.
१३ फेब्रुवारी २०१६ रोजी अब्दुलने मोनाला पळवले होते. अब्दुलने घर सोडताना ५० हजार रुपये सोबत घेतले होते. मोनाला घेऊन तो आधी आपल्या गावी गेला. पोलीस मागावर आहे हे समजताच तो पटणा येथे गेला. तेथून गुजरातला आला. तेथे काही दिवस लॉजमध्ये काढले. पैसे संपत आले होते. मुंबईत आल्यावर काहीतरी काम मिळेल या आशेने गुजरातहून मुंबई गाठली. मोना अब्दुलच्या बोलण्यावर भाळली होती. परंतु घरातून पळून आल्यावर तिला वास्तवाची जाणीव झाली होती. तिला घरची आठवण येत होती. रोजची ससेहोलपट तिला सहन होत नव्हती. मला घराची आठवण येते, मला परत जायचं असं ती त्याला सारखं विनवत असायची. पण तो तिला जाऊ देत नव्हता. दिवसभर काम आणि रात्री तिला अब्दुलच्या शारिरीक अत्याचाराला बळी पडावं लागायचं. तिने प्रेमाची स्वर्गीय कल्पना केली होती, पण अब्दुलच्या वासनेला तिला बळी पडावं लागत होतं. या दुष्टचक्रातून मुंबई पोलिसांनी तिची सुटका
केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ वाव्हळ, साहाय्यक पोलीस निरीक्षक जोशी,
पाटील, माने, साळोखे, आगवणे, महिला पोलीस मीना तावडे आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.
अब्दुल आणि मोना आंतरधर्मीय असल्यामुळे त्यांच्या भागात जातीय तणाव निर्माण झाला. पण दररोज अनेक प्रेमीयुगुले अशाच पद्धतीने जात, धर्म, वर्ग, प्रतिष्ठा अशा कोणत्या ना कोणत्या कारणांनी समाजाच्या विरोधाला तोंड देत असतात. या प्रकरणात मोना अल्पवयीन असल्याने अब्दुलचा गुन्हा अधिक भयंकर ठरला. वयाच्या कोवळया अवस्थेत तरुण मनं अशी भरकटली जातात. त्यातील काहींची घरवापसी होते तर काहींच्या पदरी कारावास येतो. या प्रकरणात मोना आणि अब्दुलचं अनुक्रमे तसंच झालं.

Story img Loader