Mumbai Crime : मुंबईतल्या वांद्रे टर्मिनस या ठिकाणी एका महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून एका हमालाला अटक केली आहे. ५५ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपावरुन या हमालाला अटक करण्यात आली आहे. ही घटना शनिवारी घडली. रेल्वे पोलिसांनी ही कारवाई केली.
नेमकी काय घटना घडली?
५५ वर्षांची एक महिला हरिद्वार या ठिकाणाहून ट्रेनने मुंबईत आली. शनिवारी रात्री तिची ट्रेन वांद्रे टर्मिनस या ठिकाणी पोहचली होती. ही महिला रिकाम्या ट्रेनच्या कोचमध्ये एकटीच झोपली होती. याच गोष्टीचा फायदा घेत एका हमालाने या ५५ वर्षीय महिलेवर बलात्कार केला. या महिलेच्या नातेवाईकांनी या घटनेची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे पोलिसांकडे तक्रार केली. ज्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीला शोधलं आणि त्याला अटक केली. या ठिकाणी सुरक्षा रक्षक का नव्हता हे तपासण्याचे आदेशही पोलिसांनी दिले आहेत.
पोलीस अधिकाऱ्याने नेमकं काय सांगितलं?
एका अधिकाऱ्याने इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार पीडित महिला हरिद्वारहून मुंबईत आली होती. ती तिच्या नातेवाईकांसह मुंबईत आली होती. मात्र ट्रेन मुंबईत येऊन थांबल्यानंतर या महिलेबरोबर आलेला तिचा नातलग काही कामानिमित्त बाहेर गेला होता. त्यावेळी इतर प्रवासीही ट्रेनमध्ये होते, पण एक एक करुन सगळे उतरले. ही महिलाही प्लॅटफॉर्मवर उतरली. प्लॅटफॉर्मवर तिला थोडी डुलकी लागली. आपल्याला झोप येते आहे हे लक्षात आल्याने ही महिला जवळ असलेल्या रिकाम्या ट्रेनमध्ये गेली आणि तिथे झोपली. प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेल्या हमालाने हे सगळं पाहिलं. त्यानंतर तो ती महिला झोपली आहे त्या डब्यात गेला. तिथे त्याने त्या महिलेवर बलात्कार केला.
पोलिसांनी आरोपीला नेमकी अटक कशी केली?
यानंतर जो नातलग या महिलेला सोडून गेला होता तो परतला. त्याला पाहून हमालाने पोबारा केला. यानंतर महिला आणि तिचा नातलग दोघांनीही रेल्वे सुरक्षा दलाचं कार्यालय गाठलं आणि रेल्वे पोलिसांना घडलेली सगळी घटना सांगितली. ज्यानंतर पोलिसांनी सीसटीव्ही फुटेज तपासलं आणि हमलाला अटक केली.पोलिसांनी वांद्रे टर्मिनसच्या सीसीटीव्हीची पडताळणी केली. त्यानंतर आरोपी पुन्हा एकदा वांद्रे टर्मिनसमध्ये आला, पहाटे पाच वाजता त्याला रिकाम्या ट्रेनमधून ताब्यात घेतलं आणि नंतर त्याला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी फुटपाथवर राहतो. या प्रकरणात आरोपीला न्यायालयातही हजर करण्यात आलं होतं. न्यायालयाने त्याची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे.