मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थात सीएसएमटी या रेल्वे स्थानकाचा जगातील सर्वात आश्चर्यकारक रेल्वे स्थानकांच्या यादीत समावेश झाला आहे. विशेष म्हणजे, यावर्षीच 132 वर्षे पूर्ण झालेल्या सीएसएमटी स्थानकाने जगातील सर्वात आश्चर्यकारक स्थानकांच्या यादीमध्ये थेट दुसरा क्रमांक पटकावलाय. मध्य रेल्वेने ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘वंडर्सलिस्ट’ या संकेतस्थळाने जगातील दहा आश्चर्यकारक रेल्वेस्थानकांची यादी जाहीर केली आहे. न्यू-यॉर्कच्या ग्रँड सेंट्रल टर्मिनलने या यादीमध्ये अव्वल क्रमांक मिळवलाय, तर लंडनचं सेंट पँक्रास इंटरनॅशनल स्थानक तिसऱ्या क्रमांकावर आहे. सीएसएमटी हे स्थानक म्हणजे वास्तूकलेचा अद्भूत नमूना असून यूनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळालेलं एकमेव स्थानक आहे अशा शब्दांमध्ये या संकेतस्थळाने सीएसएमटीचा गौरव केलाय. हे भारतातील सर्वाधिक वर्दळीचं स्थानक असून दररोज तीन दशलक्ष प्रवासी येथून प्रवास करतात. मुघल आणि व्हिक्टोरियन गॉथिकच्या वास्तूकलेवर आधारित हे स्थानक फेड्रीक विल्यम स्टिव्हन्स यांनी बांधलं असून या स्थानकाचं नाव आधी व्हिक्टोरिया टर्मिनस असं होतं, पण नंतर त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देण्यात आलं.

जगातील 10 सर्वाधिक आश्चर्यकारक रेल्वे स्थानकांची यादी : –
1 – ग्रँड सेंट्रल टर्मिनल, न्यू-यॉर्क
2 – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस , मुंबई<br /> 3 – सेंट पँक्रास इंटरनॅशनल , लंडन
4 – अटोचा स्टेशन, माद्रिद
5 – अँटवर्प सेंट्रल, अँटवर्प
6 – गारे डू नॉर्ड, पॅरिस
7 – सिरकेसी स्टेशन, इस्तांबुल
8 – सीएफएम रेल्वे स्टेशन, मापुटो (Maputo)
9 – कानाझ्वा स्टेशन, कानाझ्वा (Kanazawa)
10 – क्वालालंपूर रेल्वे स्टेशन ,मलेशिया

जाणून घेऊयात लाखोंच्या संख्येने प्रवाशांची वर्दळ असणाऱ्या या स्थानकाबद्दलच्या खास गोष्टी…

१)
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) हे मुंबई शहरामधील एक ऐतिहासिक व सर्वात मोठे रेल्वे स्थानक आहे.

२)
सीएसएमटी हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आणि त्यासोबत मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे.

३)
१८७८ मध्ये या स्थानकाच्या बांधकामाची सुरुवात झाली. या स्थानकाचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी दहा वर्ष लागले. त्या काळात कोणतीही इमारत बांधण्यासाठी लागलेला सर्वाधिक वेळ आहे.

४)
मुंबईच्या बोरीबंदर भागात असलेले हे स्थानक बोरीबंदर स्थानकाच्या जागेवर इ.स. १८८७ मध्ये व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाच्या सुवर्णजयंतीनिमित्त बांधण्यात आले.

५)
या स्थानकाची रचना फेड्रीक विल्यम स्टीव्हन्स या ब्रिटीश स्थापत्यकाराने केली आहे. या कामासाठी फेड्रीक यांना त्याकाळी १६ लाख १४ हजार रुपयांचे मानधन देण्यात आले होते.

६)
या स्थानकाची रचना ही लंडनमधील सेंट पॅकार्स रेल्वे स्थानकाशी मिळतीजुळती आहे.

७)
सीएसटीएमटी स्थानकाची रचना ही व्हिक्टोरियन इटालियन गॉथिक रिव्हायवल प्रकारची आहे.

८)
स्थानकाच्या मुख्यभागी असलेल्या घड्याळाखाली क्विन एलिझाबेटचा पुतळा होता. मात्र १९५० साली भारत सरकारच्या आदेशानुसार सर्व इमारतींवरील ब्रिटिशांचे पुतळे हटवण्यास सरुवात करण्यात आली. त्यामध्येच हा पुतळाही काढून टाकण्यात आला.

९)
हा पुतळानंतर १९८० पर्यंत राणीच्या बागेत उघड्यावर पडून होता. नंतर त्याचे काय झाले यासंदर्भात माहिती अधिकाराअंतर्गत दिलेल्या अर्जात या पुतळ्यासंदर्भात सरकारकडे कोणतीची माहिती नसल्याचे समोर आले. हा पुतळा तस्करीच्या माध्यामातून भारताबाहेर नेऊन विकण्यात आला किंवा नष्ट करण्यात आला असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

१०)
मार्च १९९६ पर्यंत या स्थानकाचे नाव व्हिक्टोरिया टर्मिनस (व्हीटी) असे होते. मात्र या स्थानकाचे नामकरण करुन ते छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) असे ठेवण्यात आले.

११)
मार्च १९९६ ते जून २०१७ दरम्यान हे स्थानक छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) नावाने ओळखले जायचे.

१२)
२०१७ साली जून महिन्यामध्ये स्थानकाच्या नावात महाराज हा शब्द लावण्यात आला आणि तेव्हा पासून हे स्थानक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) म्हणून ओळखले जाते.

१३)
सीएसएमटी स्थानकामध्ये १८ फलाट असून फलाट क्र. १ ते ७ हे मुंबई उपनगरी मार्गिकेवरील स्थानकाचे आहेत.

१४)
फलाट क्र. ८ ते १८ हे मुख्य मार्गिकेवरील असून तेथून लांब पल्ल्याच्या पॅसेंजर / जलद गाड्या मार्गस्थ होतात.

१५)
महाराष्ट्राच्या ७ आश्चर्यांपैकी छत्रपती शिवाजी टर्मिनस हे एक आश्चर्य ठरले आहे. महाराष्ट्रातील अद्भुत आणि देखण्या सात आश्चर्यांची जून २०१३ मध्ये घोषणा करण्यात आली.

१६)
२००८ साली झालेल्या मुंबई हल्ल्यांमध्ये या स्थानकालाही दहशतवाद्यांनी लक्ष्य केले.

१७)
रात्री साडेनऊच्या सुमारास अजमल कसाब आणि त्याचा साथीदार ए के ४७ बंदूका घेऊन अंदाधुंद गोळीबार करत स्थानकामध्ये शिरले. या हल्ल्यात सीएसटी स्थानकावरील ५८ जणांचा मृत्यू झाला तर १०४ जण जखमी झाले.

१८)
स्लमडॉग मिलेनियर या सिनेमातील जय हो हे गाणे या स्थानकात चित्रित करण्यात आले आहे. तसेच २०११ साली आलेल्या रा.वन. सिनेमामध्येही हे स्थानक दाखवण्यात आले आहे.

१९)
मुंबईतील सर्वात गजबजलेले स्थानक असलेले छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातील प्रवाशांची संख्या घटली आहे.

२०)
मागील  वर्षात म्हणजेच २००७ ते २०१८ दरम्यान सीएसएमटी स्थानकात तब्बल ४७.४ टक्के प्रवाशांची संख्या घटली असल्याचे समोर आले आहे.

२१)
वर्ष २००७-०८ मध्ये प्रवासी संख्या ८.८ कोटी होती. ती, २०१८-१९मध्ये घटून ४.६ कोटी झाली आहे.  दक्षिण मुंबईतून अनेक कार्यालयांचे मुंबईतील उत्तर आणि पश्चिम भागात स्थलांतर झाले आहे. त्याच्या परिणामी ही संख्या घटल्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

२२)
लांब पल्ल्याच्या गाडीतून आरक्षित आणि अनारक्षित प्रवास करणाऱ्या प्रवासी संख्येत २२ लाखाहून ३ लाख म्हणजे जवळपास ४ टक्के घट झाली आहे.

२३)
या स्थानकामध्येच रेल्वेचे एक संग्रहालय असून त्यामध्ये या स्थानकाचा इतिहास चित्ररुपात मांडण्यात आला आहे.

२४)
या स्थानकामधून दर चार ते पाच मिनिटांनी एक लोकल ट्रेन सुटते.