मुंबई : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील (सीएसएमटी) फलाट क्रमांक १० ते १४ च्या विस्तारीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. सध्या या फलाटांवर १२ ते १८ डब्यांच्या एक्स्प्रेस उभ्या राहू शकतात. मात्र फलाटांची लांबी वाढविल्यानंतर तेथे २४ डब्यांची एक्स्प्रेस उभी राहू शकणार आहे. फलाट विस्तारीकरणाचे पहिल्या टप्प्यातील ४५ टक्के कामे पूर्ण झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सीएसएमटीवरून दररोज ९० लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्या सुटतात. मात्र फलाट क्रमांक १० ते १४ ची लांबी कमी असल्याने येथे २४ डब्यांची रेल्वेगाडी उभी राहू शकत नाही. त्यामुळे मुंबई – पुण्यादरम्यान धावणाऱ्या एक्स्प्रेसच्या डब्यांची संख्या वाढविता आलेली नाही. रेल्वेगाडीच्या डब्यांची संख्या वाढवण्यासाठी फलाटांचे विस्तारीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. या प्रकल्पासाठी एकूण ६२.१२ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून पाचही फलाटांच्या विस्तारीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर सीएसएमटी – दादर विभागातील रेल्वेगाड्यांच्या वेगात आणखी सुधारणा करण्यात येईल, असा विश्वास मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा : ईडीचे मुंबईसह देशभरात ३९ ठिकाणी छापे; ४१७ कोटींची मालमत्ता जप्त, सेलिब्रिटींनीही हवालामार्फत पैसे स्वीकारले

सीएसएसएमटीवरील फलाट क्रमांक १० आणि ११ ची सध्याची लांबी २९८ मीटर असून विस्तारीकरणानंतर ती ६८० मीटर इतकी होईल. फलाट क्रमांक १२, १३, १४ ची सध्याची लांबी ३८५ मीटर असून विस्तारीकरणानंतर ती ६९० मीटर होईल. सध्या फलाट क्रमांक १० ते १४ ची दुसऱ्या टप्प्यातील कामे सुरू आहेत. यात ओव्हर हेड वायर, सिग्नलिंग यंत्रणा, रेल्वेमार्ग जोडणी आदी कामे करण्यात येत आहेत, असे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

पूर्ण झालेली कामे

  • नवीन टर्नआउट आणि क्राॅसओव्हर मार्गिका तयार करण्यासाठी कर्नाक उड्डाणपूल पाडकाम.
  • तीन मजली सिग्नलिंग इमारत उभारणी.
  • इलेक्ट्रिकल सबस्टेशन इमारत.
  • नियंत्रण विभागाचे काम.
  • एकूण २ किमी लांबीच्या रेल्वे रूळाची उभारणी आणि जोडणी