विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांनी बदली घोटाळा, फोन टॅपिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी नोटीस पाठवली होती. आणि त्यांना बीकेसीमधील सायबर पोलीस स्टेशनमध्ये बोलावण्यात आलं होतं. मात्र, गुन्हे शाखेच्या सहपोलीस आयुक्तांनी आपल्याला फोन करून स्वत: घरी येऊन जबाब नोंदवणार असल्याचं म्हटलंय, अशी माहिती फडणवीसांनी दिली होती. त्यानुसार, आज पोलिसांचं एक पथक देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी पोहोचलंय.
पोलीस चौकशीसाठी आल्याने फडणीसांच्या बंगल्याबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर, सागर बंगल्याबाहेर भाजपा कार्यकर्त्यांनी गर्दी केली असून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर सागर बंगल्याबाहेर हजर होते. तर, नितेश राणे देखील सागर बंगल्यावर होते. देवेंद्र फडणवीसांच्या पोलीस चौकशीवरून त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. तुम्ही जेवढं आम्हाला दाबण्याचा प्रयत्न कराल, तेवढं जास्त आम्ही तोंड उघडू, असं नितेश राणे म्हणाले.
दरम्यान, अद्याप तरी देवेंद्र फडणवीस यांची चौकशी सुरू आहे. या चौकशीवरून भाजपा नेते राज्य सरकारवर टीका करत आहेत. दरम्यान, ही चौकशी संपल्यानंतर देवेंद्र फडणवीस काय बोलणार आणि चौकशीतून काय समोर येतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.