मुंबई : मुंबईतील नोकरदारांना नित्यनियमाने घरचा जेवणाचा डबा कार्यालयात पोहोचविण्यासाठी अविवत मेहनत घेणाऱ्या मुंबईच्या डबेवाल्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार) पाठींबा दिला आहे. भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) मुंबईच्या डबेवाल्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली, असा विश्वास व्यक्त करीत मुंबई डबेवाला असोशिएशनने वरील निर्णय जाहीर केला.

मुंबईचे डबेवाले गेली अनेक वर्षे घरच्या जेवणाचे डबे कार्यालयांमध्ये पोहोचवण्याचे काम करीत आहेत. डबेवाल्यांनी कोणत्याही परिस्थितीत आपल्या सेवेमध्ये खंड पडू दिलेला नाही. ऊन, वारा, जोरदार पाऊस असला तरी मुंबईचा डबेवाला आपली सेवा देण्यासाठी हजर असतो. मुंबई डबेवाला असोसिएशनने लोकसभा, तसेच विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला (ठाकरे) पाठिंबा दिला होता. डबेवाल्यांचे प्रलंबित प्रश्न उद्धव ठाकरे सोडवतील आणि त्यांना परवडणाऱ्या दरात मुंबईत घर देतील,असा विश्वास डबेवाला असोसिएशनला यावेळी होता. त्यामुळे दोन्ही निवडणुकांच्या वेळी मुंबई डबेवाला असोसिएशनने शिवसेनेला (ठाकरे) पाठिंबा दिला होता. दरम्यान, निवडणुकीच्या वेळी दिलेली आश्वासन पूर्ण न केल्यामुळे डबेवाला संघटनेने शिवसेनेचे (ठाकरे) पक्प्रषमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जाहीर करण्यात आलेल्या शिवसेनेच्या वचननाम्यामध्ये मुंबईतील डबेवाल्यांसाठी काही आश्वासने दिली होती. यामध्ये, मुंबईतील डबेवाल्यांना संघटित करून स्वतंत्र कंपनी स्थापन करणार, या कंपनीला पहिल्या वर्षी किमान ५ कोटी रुपयांचे आर्थिक पाठबळ देणार, तसेच सायकल खरेदी / पार्किंगसाठी सहकार्य, मुलांचे शिक्षण, कुटुंबाला आरोग्य सेवा देण्यासाठी कार्पोरेट व सामाजिक विभागांमार्फत मदत, कार्यालय, तसेच विश्रांतीसाठी मुंबईत डबेवाला भवन बांधणार अशी आश्वासने देण्यात आली होती. यापैकी केवळ डबेवाला भवनाव्यतिरिक्त दुसरे कोणतेच आश्वासन पूर्ण केले नाही. याबाबत पत्रव्यवहारही केला होता. मात्र त्याचे साधे उत्तर आम्हाला मिळालेले नाही. यामुळे डबेवाला कामगारांमध्ये शिवसेनेबद्दल (ठाकरे) मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे, असे मुंबई डबेवाला असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी सांगितले. मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेची पाच वर्षे सत्ता होती. काही काळ उध्दव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. तरीही वचने पूर्ण झाली नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, डबेवाला कामगारांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. प्रामुख्याने घरांचा प्रश्न महत्त्वाचा आहे.‌ हा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष सोडवू शकतो, असा विश्वास डबेवाला कामगारांनी दाखविला आहे.‌ तसेच मुंबईचे डबेवाले हे बहुतांशी पुण्याचे आहेत. अजित पवार पुण्याचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे आमचा प्रश्न ते नक्कीच मार्गी लावतील, असा विश्वास डबेवाला कामगारांनी व्यक्त केला.

Story img Loader