‘स्वच्छता मोहीमे’चा प्रचार करण्यासाठी सदिच्छादूत होण्याचे आमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्यानंतर मुंबईतील डबेवाल्यांनी लागलीच या हाकेला प्रतिसाद दिला. आपल्या दीड लाख ग्राहकांमध्ये स्वच्छता मोहिमेचा संदेश पोहोचवण्याचा निर्णय डबेवाल्यांनी घेतला आहे. त्याचबरोबर हाती झाडू उचलत अंधेरी रेल्वे स्थानक स्वच्छ केले. पंतप्रधान मोदींनी स्वच्छता मोहिमेच्या प्रसारासाठी साद घालताच डबेवाल्यांनी गुरुवारी दुपारी मुंबईच्या अंधेरी स्थानकावर बैठक घेतली. यावेळी मुंबईतील सर्व डबेवाले आपल्या १.५० लाख ग्राहकांपर्यंत हा स्वच्छतेचा संदेश पोहचवतील, असा निर्णय घेण्यात आला. तसेच मोहिमेचे पहिले पाऊल म्हणून डब्बेवाल्यांनी अंधेरी स्थानक स्वच्छ करण्यासाठी झाडू हाती घेतला.  आतापर्यंत पंतप्रधान मोदींनी विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींची स्वच्छता मोहिमेत सदिच्छादूत म्हणून निवड केली आहे. त्यात डबेवाल्यांचा समावेश करून पंतप्रधानांनी आमचा गौरव केल्याची भावना ‘मुंबई डबे जेवण वाटप’ मंडळाचे सदस्य सोपान मरे यांनी सांगितले. स्वच्छता मोहिमेतील सहभागासाठीचा कृती कार्यक्रम ठरवण्यासाठी लवकरच लोअर परळ  स्थानकावर एक सभा घेण्यात येईल.

Story img Loader