आपल्या व्यवस्थापनाच्या कौशल्याने इंग्लंड-अमेरिकेतील मोठमोठय़ा व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थांना भुरळ घालणारे मुंबईचे डबेवाले आता दुबईतील कॉर्पोरेट क्षेत्रावर आपली छाप सोडण्यासाठी निघाले आहेत. दुबई येथे ४ व ५ जून रोजी होणाऱ्या गल्फ कोऑपरेशन कौन्सिल परिषदेत डबेवाल्यांचे प्रतिनिधी म्हणून अरविंद तळेकर डबेवाल्यांच्या व्यवस्थापनाचा मंत्र जगाला सांगणार आहेत.
मुंबईतील पाच हजार डबेवाल्यांचे प्रतिनिधित्त्व करण्यासाठी आपण दुबईला जाणार असल्याचे नूतन मुंबई टिफीन बॉक्स सप्लायर्स या संघटनेचे प्रवक्ते अरविंद तळेकर यांनी सांगितले. या परिषदेत मुंबईच्या डबेवाल्यांच्या यशाचा मंत्र आपण जगापुढे मांडणार आहोत. तसेच वेळ आणि पुरवठा यांचे नियोजन कसे केले जाते, याचे सूत्रही आपण उलगडून दाखवणार आहोत, असे ते म्हणाले.
डबेवाल्यांच्या पूर्ण दिवसाचे वेळापत्रक, त्यांचा इतिहास, दिवसभरातील त्यांची कामे या सर्वाबाबत एक सादरीकरण या परिषदेत करण्यात येणार आहे. नेतृत्त्वातील नवनव्या कल्पना, निर्णयक्षमता सुधारण्यासाठीची कौशल्ये, योजना प्रत्यक्ष उतरवण्यासाठी करण्यात येणाऱ्या खटपटी आदी गोष्टींबाबत या परिषदेत चर्चा होईल.