मुंबई : मुंबईतील शेकडो नोकरदारांना घरचा जेवणाचा डबे पोहोचविणारे डबेवाले येत्या ९ एप्रिलपासून सहा दिवसांच्या रजेवर जात आहेत. बहुतांश डबेवाले पुण्याच्या मावळ भागातील असून पुढील आठवड्यात ते गावातील यात्रांसाठी जाणार आहेत. तसेच, या कालावधीत अन्य वैयक्तिक कामांव्यतिरिक्त शेतीची कामे करण्यासाठी डबेवाल्यांच्या गावी जात आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईतील विविध कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या नोकरदारांना घरचा जेवणाचे डबा पोहोचवण्याचे काम डबेवाले करतात. करोना काळापासून डबेवाल्यांच्या व्यवसायाला उतरती कळा लागली आहेत. या ग्राहकांना वेळेवर डबे पोहोचवण्यासाठी डबेवाल्यांना मोठी कसरत करावी लागते. वर्षभर नोकरदारांना जेवण पोहोचवणारे डबेवाले दरवर्षी एप्रिल महिन्यात रजा घेऊन गावी जातात. मुंबईतील डबेवाले मूळचे मावळ, खेड, आंबेगाव, जुन्नर, लिंबगाव, दावडी, जेजुरी या भागातील आहेत.

एप्रिल महिन्यात खंडोबा आणि अन्य ग्रामदेवतांच्या यात्रा असल्याने ते दरवर्षी गावी दर्शनासाठी, तसेच शेतीच्या कामांसाठी ते गावी जातात. यंदाही ९ ते १४ एप्रिलदरम्यान डबेवाले आपापल्या गावी जाणार असल्याने या काळात डबेवाल्यांची सेवा बंद राहणार आहे. याबाबत मुंबई डबेवाला असोसिएशनने दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच, या कालावधीत पैसे न कापण्याची विनंती देखील त्यांनी ग्राहकांकडे केली आहे. चैत्रपौर्णिमेला शेवटची यात्रा संपल्यानंतर १५ एप्रिलपासून डबेवाले पुन्हा सेवेवर रुजू होणार असल्याचे, डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी सांगितले.