मुंबई : लोकल आणि बेस्टची बस मुंबईच्या जीवनवाहिन्या म्हणून ओळखल्या जातात. महागाईच्या काळात प्रवाशांचा प्रवास कमी खर्चात होतो. परंतु, बेस्ट बसची भाडेवाढ करण्याचा घाट घालण्यात आला असून भाडे दुप्पट करण्यात येत आहे. त्याचा भार सर्वसामान्य प्रवाशांवर पडणार असून त्यास मुंबईच्या डबेवाल्यांनी विरोध केला आहे.
गेली काही वर्षे बेस्ट उपक्रमाच्या ढिसाळ कारभाराचा प्रवाशांना फटका बसत आहे. आर्थिक बेशिस्त, नव्या योजनांचा अभाव आदी विविध कारणांमुळे बेस्टची आर्थिक स्थिती खालावतच आहे. बेस्टची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी तिकीट दरवाढ करणे अत्यंत चुकीचे आहे. भाडेवाढ न करता बेस्टचा कारभार नक्कीच सुधारेल, असे मत मुंबई डबेवाला असोशिएशन व्यक्त केले आहे.
बेस्टच्या अनेक जागा पडून आहेत. त्याचा व्यापारी उपयोग नाही. बेस्टचे आगार मोक्याच्या जागी आहेत. कुलाब्यापासून ते दहिसर, मुलुंडपर्यंत या जागा आहेत. या जागेचे नियोजन केले, तर उत्पन्नाचा एक स्रोत उपलब्ध होईल. आर्थिक शिस्त, आवश्यक मार्ग चालू ठेवणे आणि बंद केलेले गरजेचे मार्ग सुरू करणे, बेस्ट बस ताफ्यामध्ये बसची वाढ करणे गरजेचे आहे, असे मत मुंबई डबेवाला असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी व्यक्त केले.