कोणी सुरक्षा रक्षक, तर कोणी भाजी विक्रेता; लोकल प्रवासाला परवानगी नसल्याने अडचणी
मुंबई : लोकल प्रवासावरील निर्बंध आणि काही प्रमाणात ग्राहकांचा घटलेला प्रतिसाद यांमुळे वर्षांनुवर्षे मुंबईचा ‘डबेवाला’म्हणून असलेली ओळख करोनाने पुसली आहे. उत्पन्नासाठी अनेक डबेवाल्यांनी दुसरा पर्याय शोधला असून कोणी सुरक्ष रक्षक म्हणून नोकरी पत्करली आहे, तर कोणी भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू के ला आहे. पुन्हा डबे व्यवसायासाठी सरकारनेही लोकल प्रवासाची परवानगी द्यावी, अशी मागणी डबेवाला संघटनेने राज्य सरकारकडे के ली आहे.
विरार ते चर्चगेट, कल्याण, पनवेल, वाशी ते सीएसएमटी अशा तीन्ही मार्गावर जेवणाचे डबे पोहोचवणारे बहुतांश डबेवाले मुंबईच्या लोकलवरच अवलंबून आहेत. मुंबईतील साडे चार ते पाच हजार डबेवाले टाळेबंदीआधी साधारण दोन ते अडीच लाख नोकरदारवर्ग, शालेय विद्यार्थी, दुकानदार यांना डबा पोहोचवण्याचे काम करत होते. प्रत्येक डबेवाला हा २० ते २५ डबे पोहोचवत होता. यातून प्रत्येक डबेवाल्याला १५ हजार ते १६ हजार रुपये महिन्याकाठी मिळत होते. परंतु करोनामुळे टाळेबंदी लागली आणि लोकलही बंदी झाली. त्याबरोबरीने हा व्यवसायही बंद झाला. उत्पन्न नसल्याने अनेक डबेवाले हे गावी गेले. परिणामी डबेवाल्यांना आर्थिक चणचणही भासू लागली. गेल्या वर्षभरापासून टाळेबंदीमुळे निर्बंध व शिथिलता होत असल्याने याचा फटका डबेवाल्यांनाही बसत आहे. यामुळे व्यवसाय होत नसल्याने गेली अनेक वर्ष डबे पोहोचवण्याचे काम करणाऱ्या डबेवाल्यांनी उत्पन्नसाठी दुसऱ्या व्यवसायाचा मार्गही निवडला आहे.
मुंबईत गेली ३५ वर्ष डबे पोहोचवण्याचे काम करणारे लक्ष्मण टकवे (५७ वय) यांनी डबे सेवा ठप्प झाल्याने उत्पन्नासाठी आपल्या गावी कामशेतकडे जाण्याचा निर्णय घेतला. डबे पोहोचवण्यातून महिन्याला १५ ते १६ हजार रुपये उत्पन्न मिळत असे. करोनामुळे आर्थिक स्थिती बिकट झाली व गावी जाऊन भाजी विकण्याचा व्यवसाय सुरू के ल्याचे ते म्हणाले. गेले दहा महिने गावी भाजी विकण्याचा व्यवसाय करत असल्याचे सांगितले. मुंबईला येऊन पुन्हा डबे विकण्याचा विचार आहे. परंतु सातत्याने लोकल प्रवासावर बंदी असल्याने ते करणार कसे, असा प्रश्न उपस्थित के ला. मालाडला राहणारे शिवाजी मेदगे (५१ वय) हे गेली २४ वर्ष डबे पोहोचवण्याचे काम करत होते. परंतु करोनामुळे डब्याच्या व्यवसायावरच गदा आली आणि आर्थिक संकट कोसळले. त्यामुळे त्यांनी मालाडमध्ये खासगी कं पनीचा सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी पत्करली आहे. करोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर आणि लोकल प्रवासाची परवानगी मिळाली तेव्हा रात्री सुरक्षा रक्षकाची नोकरी आणि सकाळी डबे पोहोचवण्याचे काम करत होते. परंतु दुसऱ्या लाटेतही लोकल प्रवासावर बंधने येताच त्यांना सुरक्षा रक्षकाच्या नोकरीवरच अवलंबून राहावे लागल्याचे सांगतात. पत्नी, दोन मुले व आई असून संपूर्ण कुटुंबाची मदार त्यांच्यावरच असल्याचे शिवाजी म्हणाले. लोकल प्रवासाची परवानगी मिळाल्यास डब्यांच्या व्यवसायात उतरू, अशी इच्छा त्यांनी व्यक्त के ली.
लोकल प्रवासाची मुभा नसल्याने डबेवाल्यांचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. काहीजणांचे कुटुंब या व्यवसायावर अवलंबून आहे. परंतु व्यवसाय ठप्पच झाल्याने अनेकांनी दुसऱ्या व्यवसायाकडे पाठ फिरवली आहे. लोकल प्रवासाची परवानगी देऊन डबेवाला सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी राज्य शासनाकडे के ली आहे.
– नितीन सावंत, सचिव, नूतन मुंबई टिफीन बॉक्स सप्लायर चॅरिटी ट्रस्ट