मुंबई : दादरमधील इंदू मिल येथे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) माध्यमातून उभारण्यात येणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक रखडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० वर्षांपूर्वी स्मारकाचे भूमिपूजन केले होते. मात्र तरी स्मारकाच्या पूर्णत्वाची आंबेडकर अनुयायांची प्रतीक्षा संपताना दिसत नाही. स्मारकाचे आणि पुतळ्याचे काम पूर्ण होऊन स्मारक डिसेंबर २०२६ मध्ये खुले होईल, अशी माहिती सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.
एमएमआरडीएकडून अंदाजे १०९० कोटी रुपये खर्च करत इंदू मिलच्या ४.८४ हेक्टर जागेवर स्मारक बांधले जात आहे. या स्मारकाचे भूमिपूजन २०१५ मध्ये पंतप्रधानांच्या हस्ते झाले. मात्र भूमिपूजनानंतर तीन वर्षांनी अर्थात २०१८ मध्ये स्मारकाच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली. त्यानंतर २०२१ पर्यंत स्मारक खुले होणे अपेक्षित होते. मात्र अत्यंत संथगतीने काम सुरू असल्याने अजूनही स्मारकाचे काम पूर्ण झालेले नाही.
डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी इंदू मिलला भेट देत कामाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी कामाचा वेग वाढविण्याचे आदेश दिले, तर स्मारकाचे ८५ टक्के तर पुतळ्याचे २० टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी दिली.
‘पुतळ्यात कोणत्याही प्रकारच्या त्रुटी राहू देणार नाही!’
सामाजिक न्यायमंत्र्यांशी याविषयी संपर्क साधला असता त्यांनी आपण नियमितपणे स्मारकाच्या कामाचा, पुतळ्याच्या कामाचा आढावा घेत आहोत, असे सांगितले. पुतळ्याबाबत काही आक्षेप आहेत, त्याचीही दखल घेतली असून पुतळ्यात कोणतीही त्रुटी राहणार नाही याकडे मी स्वत: लक्ष ठेवून आहे. त्याचवेळी पुतळ्याचे, स्मारकाचे कामही लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल. संपूर्ण स्मारकाचे काम पूर्ण होऊन डिसेंबर २०२६ पर्यंत ते सर्वसामान्यांसाठी खुले होईल, असेही सामाजिक न्यायमंत्र्यांनी सांगितले, तर सात वर्षे पूर्ण झाली तरी अद्याप काम पूर्ण नाही. काम पूर्ण होण्यास आणखी दोन-अडीच वर्षे लागतील, असे म्हणत आनंदराज आंबेडकर यांनी नाराजी व्यक्त केली.
जयंती कार्यक्रमाचे समाजमाध्यमांद्वारे थेट प्रक्षेपण
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बृहन्मुंबई महापालिकेकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही चैत्यभूमी येथील डॉ. आंबेडकर जयंती कार्यक्रमाचे महानगरपालिकेच्या यूट्यूब या समाजमाध्यम खात्यावरून थेट प्रक्षेपण केले जाईल. तसेच फेसबुक, एक्स या माध्यमांवरून सहप्रक्षेपण करण्यात येणार आहे. महापालिकेच्या वतीने दादर येथील डॉ. आंबेडकर चैत्यभूमी स्मारक, ‘राजगृह’ येथील निवासस्थान आणि संबंधित परिसरांमध्ये विविध प्रकारच्या नागरी सेवा-सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे.