व्हॉट्सॲपवर जातीय तेढ निर्माण केल्याप्रकरणी मुंबईतील एका विद्यार्थ्याला अटक करण्यात आली होती. त्याची आता जामिनावर सुटका करण्यात आली. संबंधित विद्यार्थी दलित समूहाचा असून त्याची ओळख लपवून ठेवण्यात आली आहे. फ्री प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. देवनार येथील इंटरनॅशनल इन्स्टिट्युट फॉर पॉप्युलेशन सायन्सचा हा विद्यार्थी असून तो मूळचा लातूरचा आहे.
गोवंडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ जानेवारीला एका विद्यार्थ्याची तक्रार आली होती. त्यानंतर एफआयआर नोंदवण्यात आला. प्रभू रामाचे छायाचित्र असलेले स्टेटस अपलोड करून संबंधित विद्यार्थ्याने हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप तक्रारकर्त्याने केला आहे.
त्यानंतर, त्याला भारतीय दंड संहिता कलम १५३-अ (धर्म, वंश इत्यादींच्या आधारावर विविध गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे) आणि २९५अ (जाणूनबुजून आणि द्वेषपूर्ण कृत्ये, कोणत्याही वर्गाच्या धर्माचा अपमान करून धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू असलेल्या) अंतर्गत अटक करण्यात आली. त्याला दोन दिवसांहून अधिक काळ पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते आणि नंतर जामिनावर सोडण्यात आले, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
अटक करण्यात आलेला विद्यार्थी कॅम्पस गटातील आहे. त्याने कॉलेजच्या संचालकांना एक गोपनीय पत्र पाठवले होते, त्यात त्याने भगवे झेंडे आणि प्रभू रामाच्या आकाराचे पोस्टर्स कॅम्पसमधून उतरवण्यास सांगितले होते. हे सर्व राजकीय अजेंडाचा भाग असल्याचे या गटाचे म्हणणे आहे. या विद्यार्थ्याला अटक करण्यात आल्यानंतर संबंधित गटाने भावना दुखावल्याबद्दल माफीही मागितली होती.