मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील विविध विद्याशाखेअंतर्गत होणाऱ्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. पदवी स्तरावरील बी.कॉम. सत्र ६ अभ्यासक्रमाची परीक्षा १८ मार्च, बी.एस्सी. सत्र ६ अभ्यासक्रमाची परीक्षा २६ मार्च, बी.ए. सत्र ६ अभ्यासक्रमाची परीक्षा २६ मार्च २०२५ पासून सुरू होणार आहे. तर बी.एस्सी. माहिती व तंत्रज्ञान सत्र ६ बी.एस्सी. सत्र ६ अभ्यासक्रमाची परीक्षा २६ मार्च, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेअंतर्गत स्वयंअर्थसहाय्यित विषयांची परीक्षा १८ मार्च, बीएमएम आणि बीएएमएमसी सत्र ६ बी.एस्सी. सत्र ६ अभ्यासक्रमाची परीक्षा २६ मार्च २०२५ रोजी घेण्याचे विद्यापीठाने नियोजित केले आहे.
दरम्यान, विद्याशाखानिहाय मानव्य विज्ञान शाखेसाठी १४ हजार ७२३, वाणिज्य शाखेसाठी ७४ हजार ४८३, विज्ञान २७ हजार १३४, तंत्रज्ञान १३ हजार ४, विधि ८ हजार ७२५ असे एकूण १ लाख ३८ हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यामध्ये ७५ हजार ३४६ विद्यार्थी, ६२ हजार ७१७ विद्यार्थिनी आणि इतर ६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मुंबई विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील सातही जिल्ह्यांतील एकूण ४३९ परीक्षा केंद्रांवर या परीक्षा घेतल्या जाणार आहेत.
हेही वाचा…डिसेंबरअखेर राज्यात किती साखर उत्पादन ? जाणून घ्या, विभागनिहाय स्थिती आणि एकूण उत्पादनाचा अंदाज
तीन महिने आधीच आसन क्रमांकासह परीक्षा केंद्रांची माहिती ऑनलाईन उपलब्ध
मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने विकसित केलेल्या डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून https://mum.digitaluniversity.ac/ या संकेतस्थळावर ३ महिन्यापूर्वीच विद्यार्थ्यांना त्यांच्या आसन क्रमांकासह परीक्षा केंद्र आणि परीक्षेची माहिती ऑनलाईनद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांचे विषय, आसन क्रमांक आणि अनुषंगिक तपशील याबाबतचे तात्पुरते प्रवेशपत्र महाविद्यालयांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात आले असून सर्व महाविद्यालयांनी या प्रवेशपत्रातील तपशील तपासून त्यातील काही दुरुस्ती असल्यास तात्काळ विद्यापीठाशी संपर्क साधावा, असे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. पूजा रौंदळे यांनी सांगितले.