अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील तिन्ही मालमत्तांचा अखेर लिलाव झाला आहे. ११ कोटी ५० लाख रुपयांमध्ये या तिन्ही संपत्तीचा लिलाव झाला असून, सैफी बुऱ्हाणी अपलिफ्टमेंट ट्रस्टने या तिन्ही मालमत्ता विकत घेतल्या आहेत. या तिन्ही इमारती मोडकळीस आल्या असून त्यांचा पुनर्विकास करणार असल्याची माहिती ट्रस्टच्या प्रवक्त्यांनी दिली.
दाऊद इब्राहिमच्या हॉटेल रौनक अफरोज (दिल्ली झायका), शबनम गेस्ट हाऊस आणि सहा खोल्या असलेल्या डांबरवाला इमारतीचा लिलाव करण्यात आला. मंगळवारी चर्चगेटमधील आयएमसी इमारतीतील कॉन्फरन्स रुममध्ये ही लिलाव प्रक्रिया पार पडली. सुमारे डझनभर इच्छुकांनी या लिलाव प्रक्रियेत सहभाग घेतला. कडेकोट बंदोबस्तात ही प्रक्रिया पार पडली.
सैफी बुऱ्हाणी अपलिफ्टमेंट ट्रस्टने या लिलावात सर्वाधिक बोली लावून तिन्ही मालमत्ता विकत घेतल्या. रौनक अफरोझ हॉटेलसाठी ४.५३ कोटी रुपये, शबनम गेस्ट हाऊससाठी ३.५३ कोटी रुपये आणि डांबरवाला इमारतीसाठी ३.५३ कोटी रुपये ऐवढी बोली लावण्यात आल्याचे समजते. या तिन्ही मालमत्ता भेंडी बाजार येथे आहेत.
ट्रस्टच्या प्रवक्त्यांनी लिलावानंतर प्रतिक्रिया दिली आहे. या तिन्ही इमारती मोडकळीस आल्या असून त्या राहण्याजोग्या नाहीत. या तिन्ही इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांच्या सुरक्षेसाठी आणि त्या इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी आम्ही लिलावात सहभाग घेतला, असे प्रवक्त्यांनी म्हटले आहे. तस्करीत वर्चस्व निर्माण केल्यानंतर दाऊदने सर्वप्रथम मुंबईतील हॉटेल रौनक अफरोज विकत घेतले होते. दाऊदच्या हॉटेल रौनक अफरोजला पाडून त्या ठिकाणी स्वच्छतागृह बांधणार, अशी घोषणा हिंदू महासभेचे नेते स्वामी चक्रपाणी यांनी केली होती. तेदेखील या लिलावात सहभागी झाले होते. मात्र दाऊदचे हॉटेल विकत घेण्यात त्यांना अपयश आले.
The three properties fall under our ongoing Bhendi Bazaar redevelopment project.: Saifee Burhani Upliftment Trust Spokesperson
— ANI (@ANI) November 14, 2017
यापूर्वी २०१५ मध्येही दाऊदच्या मुंबईतील संपत्तीचा लिलाव करण्याचा प्रयत्न झाला होता. माजी पत्रकार एस. बाळकृष्णन यांनी रौनक हॉटेलसाठी बोलीही लावली. ४ कोटी रुपयांची बोली लावत त्यांनी लिलावात बाजी मारली. मात्र यानंतर बाळकृष्णन यांना पैसे जमा न करता आल्याने हा लिलाव रद्द करण्यात आला. अमली पदार्थ तस्करी व परकीय चलन कायदा १९७६ अन्वेय ही मालमत्ता जप्त करण्यात आली होती.