लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : भारताची राजधानी दिल्ली आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबईमधील प्रवासाचे अंतर कमी करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) १३८६ किमी लांबीच्या दिल्ली – मुंबई द्रुतगती महामार्ग बांधत आहे. या महामार्गातील महाराष्ट्रातून जाणाऱ्या शेवटच्या तलासरी – मोरबे दरम्यानच्या १५६ किमी लांबीच्या टप्प्याचे काम सध्या वेगात सुरू आहे.
आतापर्यंत या टप्प्याचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे एनएचएआयचे नियोजन आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर २०२६ मध्ये हा महामार्ग वाहतूक सेवेत दाखल करण्यात येईल आणि तलासरी – मोरबे प्रवास सुसाट होईल. त्याचबरोबर ठाणे, कल्याण, भिवंडीमधील अंतर्गत वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. संपूर्ण दिल्ली – मुंबई महामार्ग पूर्ण झाल्यानंतर मंबईहून थेट दिल्ली केवळ १२ तासात गाठता येणार आहे.
माथेरानच्या डोंगराखालून दुहेरी बोगदा
एनएचएआयकडून १३८६ किमी लांबीच्या मुंबई – दिल्ली द्रुतगती महामार्गाचे काम सध्या अनेक टप्प्यात सुरू आहे. दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांतून हा महामार्ग जात आहे. यापैकी दिल्ली – राजस्थानदरम्यानचा टप्पा सध्या वाहतूक सेवेत दाखल झाला असून पुढील राज्यातील टप्प्यांचे काम वेगात सुरू आहे. महाराष्ट्राचा विचार करता तलासरी – मोरबे दरम्यानच्या १५६ किमी लांबीच्या टप्प्याचे काम सध्या वेगात सुरू आहे. आतापर्यंत या आठ पदरी महामार्गाचे ८० टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती सुहास चिटणीस, प्रकल्प संचालक, ठाणे, एनएचएआय यांनी दिली. हा टप्पा आव्हानात्मक आहे.
या टप्प्यात माथेरानच्या डोंगराखालून जाणाऱ्या दुहेरी बोगद्याचा (ट्विन टनेल) समावेश आहे. पर्यावरणदृष्ट्या संवदेनशील अशा माथेरानच्या डोंगराखालून भुयारीकरण करणे एनएचएआयसाठी आव्हानात्मक होते. हे आव्हान पेलण्यासाठी एनएचएआयने न्यू ऑस्ट्रीयन टनेल मेथडचा (एनएटीएम) वापर केला. डोंगराखाली स्फोट करून, भुयारीकरण पूर्ण करून दोन एनएटीएम काही महिन्यांपूर्वीच बाहेर आल्याचेही चिटणीस यांनी सांगितले. एका एनएटीएमने १५ महिन्यांत, तर दुसऱ्या एनएटीएमने १७ महिन्यांत भुयारीकरणाचे काम पूर्ण केले.
बोगद्याचे ७० टक्के काम पूर्ण
अंबरनाथमधील भोज गाव ते पनवेलमधील मोरबे दरम्यान हा ४.१६ किमी लांबीचा आणि २१.४५ मीटर रुंदीचा हा दुहेरी बोगदा आहे. या बोगद्याची उंची ५.५ मीटर आहे. अशा या बोगद्याचे आतापर्यंत ७० टक्के काम पूर्ण झाल्याचेही चिटणीस यांनी सांगितले. या दुहेरी बोगद्याच्या उर्वरित कामासह तलासरी – मोरबे टप्प्याचे उर्वरित काम डिसेंबर २०२५ अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले. हे काम पूर्ण झाल्यानंतर हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्यात येईल. हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यास तलासरी – मोरबे प्रवास अतिजलद होण्यास मदत होईल. तर दुसरीकडे मुंबई – अहमदाबाद महामार्गावरील, तसेच ठाणे, कल्याण, भिवंडीतील वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होईल, असा दावा यानिमित्ताने एमएचएआयने केला आहे.