मुंबई : हिवताप व डेंग्यूचे रुग्ण साधारणपणे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात सापडतात. मात्र वातावरणातील बदलामुळे यावर्षी संपूर्ण वर्षभर अधूनमधून रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे यंदा गतवर्षीच्या तुलनेत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये किंचित वाढ झाली असली तरी हिवतापाच्या रुग्णांमध्ये घट झाली आहे. मात्र हिवताप व डेंग्यूमुळे मृत्यू होण्याच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे.
हिवतापाला प्रतिबंध करण्यासाठी राज्य सरकारकडून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. या उपाययोजनांना काहीअंशी यश येत आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात २०२४ मध्ये हिवतापाचे १५ हजार ६७० रुग्ण सापडले. तर १८ जणांचा मृत्यू झाला. गतवर्षी हिवतापाचे १९ हजार ९६८ रुग्ण सापडले असून, २३ जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे यंदा गतवर्षीच्या तुलनेत रुग्णांच्या संख्येत साधारण ४ हजाराची घट झाली. तसेच मृतांची संख्याही कमी झाली आहे. मुंबईत सर्वाधिक ७ हजार ८०६ रुग्ण सापडले तर त्याखालोखाल गडचिरोलीमध्ये ६ हजार ५७६ रुग्ण सापडले आहेत. तसेच हिवतापाने सर्वाधिक १३ मृत्यू गडचिरोलीमध्ये झाले आहेत. त्याखालोखाल मुंबईत ५ जण, रायगडमध्ये दोन आणि ठाण्यात एकाचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा…रायगडमध्ये सुरू होणार पहिले शासकीय युनानी महाविद्यालय, १०० खाटांचे रुग्णालयही सुरू होणार
हिवतापाच्या रुग्णांमध्ये घट झाली असली तरी डेंग्यूच्या रुग्णांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत यंदा किंचित वाढ झाली आहे. मात्र मृतांच्या संख्येत घट झाली आहे. राज्यात २०२४ मध्ये डेंग्यूचे १९ हजार १६० रुग्ण सापडले तर २६ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र गतवर्षी राज्यात डेंग्यूचे १९ हजार ३४ रुग्ण सापडले होते, तर ५५ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे यंदा डेंग्यूच्या रुग्णांमध्ये १२६ इतकी वाढ झाली असली तरी मृत्यूला अटकाव करण्यात आरोग्य विभागाला काहिसे यश मिळाले आहे. डेंग्यूचे सर्वाधिक म्हणजे ५ हजार ८५१ रुग्ण मुंबईत सापडले असून, त्याखालोखाल कोल्हापूरमध्ये १ हजार २३८ रुग्ण, नाशिक शहरात १ हजार १९५ रुग्ण, रायगडमध्ये ७३७ रुग्ण, पालघरमध्ये ५६५ रुग्ण, साताऱ्यामध्ये ५४२, नागपूरमध्ये ४४६ रुग्ण, चंद्रपूरमध्ये ४२५ रुग्ण सापडले. तसेच डेंग्यूने सर्वाधिक म्हणजे पाच मृत्यू मुंबईत झाले. त्याखालोखाल रायगडमध्ये चार जणांचा आणि लातूर व नागपूरमध्ये प्रत्येकी दोघांचा मृत्यू झाला.
हेही वाचा…डीआरपीपीएल नव्हे आता एनएमडीपीएल, धारावी पुनर्विकास प्रकल्प साकारणाऱ्या कंपनीच्या नावात अचानक बदल
चिकुनगुन्याच्या रुग्णांमध्ये वाढ
राज्यात चिकुनगुन्याच्या रुग्णांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत यंदा वाढ झाली आहे. जानेवारीपासून आतापर्यंत राज्यात चिकुनगुन्याचे ५ हजार ७५७ इतके रुग्ण सापडले तर गतवर्षी १ हजार ७०२ रुग्ण सापडले होते. २०२४ मध्ये चिकुनगुन्याचे सर्वाधिक म्हणजे १ हजार ८८ रुग्ण नागपूरमध्ये सापडले. त्याखालोखाल पुण्यात ७५१ रुग्ण, मुंबईत ७३५ रुग्ण सापडले.