मुंबई : पर्युषण काळात ४ सप्टेंबर रोजी देवनार पशुवधगृह बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच ७ सप्टेंबर रोजी गणेशचतुर्थीनिमित्त पशुवधगृह बंद राहणार आहे. त्यामुळे पर्युषण काळात एकूण दोन दिवस देवनार पशुवधगृह बंद राहणार आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबई महापालिकेने याबाबतचे परिपत्रक जारी केले आहे. मुंबई हे सर्वधर्मियांचा समावेश असलेले शहर असून देवनार पशुवधगृहातून मुंबईच्या बाहेरही मांसविक्री होत असते आणि त्यावर अनेकांचा रोजगार अवलंबून आहे, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
जैन धर्मियांचा सण असलेल्या पर्युषण काळात म्हणजेच ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या कालावधीत संपूर्ण राज्यात पशुहत्या आणि मांस विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्यात यावी या मागणीसाठी शेठ मोतीशॉ लालबाग जैन चॅरिटीजच्या वतीने जनहित याचिका करण्यात आली होती. मागणीबाबत या संस्थेसह इतर ३० जैन धर्मादाय ट्रस्टनी मुंबई महानगरपालिका व संबंधित यंत्रणांना विविध निवेदने दिली होती. पर्युषण काळाचे पवित्र स्वरूप विचारात घेता जैन समाजातील नागरिकांना राज्याच्या जवळपास सर्व भागांमध्ये या कालावधीत सुरू असलेल्या प्राण्यांच्या कत्तलीचे साक्षीदार होण्यास भाग पाडले जाते, असा दावाही याचिकाकर्त्यांनी पशुहत्या, मांसविक्रीवरील तात्पुरत्या बंदीची मागणी करताना केला होता. त्यामुळे ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या कालावधीत संपूर्ण राज्यात पशुहत्या आणि मांस विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्यात यावी या जैन धर्मियांच्या मागणीवर तातडीने निर्णय घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने गुरुवारी राज्यातील सर्व महापालिकांना दिले. त्यानुसार मुंबई महापालिका प्रशासनाने ३० ऑगस्ट रोजी याबाबत परिपत्रक जारी केले.
हेही वाचा – राजस्थान सरकारचे मुंबईत ४ लाख कोटी गुंतवणुकीचे करार
मुंबई महापालिकेने ९ ऑक्टोबर २०१५ रोजी एक ठराव केला होता. त्यानुसार वर्षभरातील १५ दिवस देवनार पशुवधगृह बंद ठेवता येते. त्याअंतर्गत यंदा ७ सप्टेंबर रोजी गणेशचतुर्थीनिमित्त देवनार पशुवधगृह बंद राहणार आहे. त्याचबरोबर ४ सप्टेंबर रोजी पर्युषण काळानिमित्त पशुवधगृह बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबईत सर्वधर्मिय वास्तव्यास आहेत. या शहरात विविध धर्मियांचे, विविध भाषिक लोक राहतात. त्यापैकी अनेक समुदायाचे मासे व मांस हे रोजचे अन्न आहे. तसेच देवनार पशुवधगृहातून केवळ मुंबईतच नव्हे तर संपूर्ण मुंबई महानगराला मांसपुरवठा केला जातो. तसेच या उद्योगावर अनेकांचा रोजगार आहे. त्यामुळे संपूर्ण पर्युषण काळात देवनार पशुवधगृह बंद ठेवणे योग्य होणार नाही, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले.