मुंबई : पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी गणेशमूर्ती मातीची असावी अशा आग्रहाखातर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्लास्टर ऑफ पॅरीसच्या (पीओपी) गणेशमूर्तींवर बंदी घातली. मात्र, मूर्तीकारांचे नुकसान होत असल्याचे कारण देत या निर्णयाला राजकीय पक्ष, संघटनांकडून होत असलेला विरोध आणि स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष यांमुळे यंदाही बाजारात पीओपीच्या गणेशमूर्तीच अधिक दिसत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्लास्टर ऑफ पॅरिसपासून तयार केलेल्या गणेशमूर्ती पाण्यात पटकन विरघळत नसल्यामुळे समुद्रातील जैवविविधतेचे नुकसान होते. ही संभाव्य परिस्थिती टाळण्यासाठी पीओपीपेक्षा शाडू मातीपासून तयार केलेली गणेशमूर्ती घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. प्रत्यक्षात पीओपीच्या गणेशमूर्तींवर बंदी आहे. मात्र स्थानिक प्रशासनाने बंदीची अंमलबजावणी केलेली नाही. तसेच ‘पीओपी’ची गणेशमूर्ती ही शाडू मातीच्या मूर्तीच्या तुलनेत वजनाने हलकी, हाताळण्यास सोपी आणि स्वस्त असल्यामुळे नागरिकांचीही मागणी आहे. यंदा बाजारात जवळपास ८० टक्के पीओपी, १५ टक्के शाडू माती आणि ५ टक्के कागदी लगद्यापासून तयार केलेल्या घरगुती गणेशमूर्ती आहेत.

हेही वाचा…राष्ट्रीय उद्यान अतिक्रमणमुक्त करण्याचे आदेश, बेकायदा झोपडीधारकांच्या तातडीच्या पुनर्वसनासाठी धोरण आखण्याबाबत सूचना

‘पीओपीपासून तयार केलेली गणेशमूर्ती हाताळणे सूकर होते. शाडू मातीपासून तयार केलेली गणेशमूर्ती अत्यंत जपावी लागते. शहरातून बाहेरगावी गणेशमूर्ती नेत असताना रस्त्यात खड्डे असल्यामुळे मूर्तीला हादरे बसतात. परंतु ‘पीओपी’ गणेशमूर्तीचा भंग होत नाही. शाडू मातीच्या मूर्तीपेक्षा पीओपीची गणेशमूर्ती ही वजनाने हलकी आणि मजबूत असते. त्यामुळे यंदाही नागरिकांचा पीओपीपासून तयार केलेल्या गणेशमूर्ती घेण्याकडे कल आहे. परिणामी सध्या बाजारात सर्वाधिक घरगुती गणेशमूर्ती या ‘पीओपी’पासून तयार केलेल्या आहेत’, असे लालबागमध्ये गणेशमूर्तीची विक्री करणाऱ्या राजू चाळके यांनी सांगितले.

शाडू मातीपासून तयार केलेल्या गणेशमूर्तीचे विसर्जन व्यवस्थित होते. याबाबत नागरिकांना व्यवस्थित माहिती आहे, ते पूर्वीपासून शाडू मातीपासून तयार केलेली गणेशमूर्ती घेणे पसंत करतात. आमच्याकडे शाडू मातीची गणेशमूर्ती घेणारे नागरिक गेल्या ७५ वर्षांपासून येत आहेत’, असे शाडू मातीपासून गणेशमूर्ती तयार करणारे गिरगावमधील मूर्तीकार गणेश मादुस्कर यांनी सांगितले.

हेही वाचा…मुंबई : चौपाटीवर गेलेल्या दोन मुलींचा पाठलाग करणाऱ्याला १२ तासांत अटक

पीओपीच्या गणेशमूर्तींवर बंदी आहे. मात्र स्थानिक प्रशासनाने बंदीची अंमलबजावणी केलेली नाही. ‘पीओपी’ची मूर्ती ही शाडूच्या मूर्तीच्या तुलनेत वजनाने हलकी व स्वस्त असल्यामुळे नागरिकांचीही मागणी आहे.

हेही वाचा…अभिमत विद्यापीठातून डॉक्टर होण्यासाठी कोट्यवधींचा खर्च, राज्यातील बहुतेक अभिमत विद्यापीठात वैद्यकीय पदवी शिक्षणाचे शुल्क कोटींच्या घरात

‘रोजगार संपेल’

मुंबईसह कोकणात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या घरगुती गणेशमूर्ती बनवण्याच्या व्यवसायावर अनेक कुटुंबे अवलंबून आहेत. अनेकांचा पिढ्यानपिढ्या हा व्यवसाय आहे. गणेशोत्सवातील कमाईवर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. त्यामुळे ‘पीओपी’च्या गणेशमूर्तींवर सरसकट बंदी घालणे योग्य ठरणार नाही आणि बहुसंख्य कुटुंबांचा रोजगार संपेल असे अनेकांचे म्हणणे आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai despite ban of plaster of paris ganesha idols continues dominate market amid environmental concerns mumbai print news psg