मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत धारावीतील बांधकामांचे सर्वेक्षण करण्यात येत असून गेल्या महिन्याभरात धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेडने (डीआरपीपीएल) सुमारे एक हजार बांधकामांचे सर्वेक्षण पूर्ण केले. येथील बांधकामांची संख्या एक लाखांच्या घरात असल्याने सर्वेक्षणाचा वेग वाढविण्याची गरज असून डीआरपीपीएलने सर्वेक्षण करणाऱ्या पथकांची संख्या शंभरपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत बांधकामांचे सर्वेक्षण आणि रहिवाशांची पात्रता निश्चिती करण्याचे काम सध्या सुरू आहे. डीआरपीपीएलने हे काम १८ मार्च रोजी सुरू केले. कमला रमण नगर येथून या कामास सुरुवात झाली होती. सर्वेक्षणाला सुरुवात होऊन गुरुवार, १८ एप्रिल रोजी एक महिना पूर्ण होत आहे. या महिन्याभराच्या कालावधीत अंदाजे एक हजार बांधकामांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आल्याची माहिती डीआरपीपीएलकडून देण्यात आली. सध्या १५ पथकांच्या माधम्यातून सर्वेक्षण करण्यात येत आहे. सर्वेक्षणाचे काम शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याचे डीआरपीपीएलचे नियोजन आहे.
हेही वाचा : मुंबई : सराईत मोबाइल चोरांना अटक, ३० मोबाइल हस्तगत
धारावीत अगदी अरुंद गल्लीबोळात हे सर्वेक्षण सुरू आहे. तर संगणकीय पद्धतीने हे सर्वेक्षण करण्यात येत असताना नेटवर्कसह अन्यही अडचणी येत आहेत. या सर्व बाबी लक्षात घेता संपूर्ण धारावीचे सर्वक्षण पूर्ण करण्यासाठी सर्वेक्षणाचा वेग वाढविण्याचा निर्णय डीआरपीपीएलने घेतला आहे. त्यानुसार आता सर्वेक्षण करणाऱ्या पथकांची संख्या १५ वरून शंभरपर्यंत नेण्यात येणार असल्याचेही डीआरपीपीएलकडून सांगण्यात येत आहे.