मुंबई : धारावी पुनर्विकासात रहिवाशांनी ५०० चौरस फुटाची मागणी लावून धरली असली तरी त्यांना ३५० चौरस फुट घर मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. इमारत तसेच चाळीत राहणाऱ्या रहिवाशांना मात्र ते राहत असलेल्या घरापेक्षा मोठे घर मिळणार आहे. याबाबतच्या नियमावलीत तशी तरतूद असल्याचे या घडामोडींशी संबंधित सूत्रांनी सांगितले. धारावी पुनर्विकासासाठी राज्य शासनाने अदानी समूहाच्या धारावी पुनर्विकास प्रा. लि. या विशेष हेतु कंपनीची स्थापना केली आहे. या कंपनीत राज्य शासनाचा २० टक्के वाटा आहे. धारावीतील झोपडीवासीयांचे लवकरच सर्वेक्षण केले जाणार असल्याचे या कंपनीने जाहीर केले आहे. अशा वेळी ५०० चौरस फुटाचे घर मिळावे, यासाठी धारावीकरांनी आंदोलन सुरू केले आहे. त्याबाबत शासनानेही मौन धारण केले आहे. अशातच इमारत व चाळीत राहणाऱ्या रहिवाशांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. या इमारत वा चाळीत राहणाऱ्या रहिवाशांना नेमके किती आकाराचे घर मिळणार याबाबत संभ्रम आहे. मात्र नियमावलीतच या रहिवाशांबाबत तरतूद असल्यामुळे त्यांना मोठ्या आकाराचे घर मिळणार असल्याचे या सूत्रांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा