मुंबई : पोलीस दलातून बडतर्फ केलेल्या एका कर्मचाऱ्याने अनेक दुकानदारांना धमकावत त्यांच्याकडून खंडणी उकळल्याचा प्रकार आझाद मैदान परिसरात समोर आला आहे. याबाबत गुन्हा दाखल होताच आझाद मैदान पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्याला अटक केली आहे.
उत्तम केशव मोरे (५३) असे या आरोपीचे नाव असून तो २०११ मध्ये नागपाडा पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार या पदावर कार्यरत होता. त्यावेळी आरोपीने अशाच प्रकारे काही जणांची फसवणूक केली होती. त्यावेळी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आले होते. त्यानंतरही तो अनेकांना पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून फसवणूक करत होता.
हेही वाचा…स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मोर्चेबांधणी, १८, १९ जानेवारीला अजित पवार गटाचे छ. संभाजीनगरला शिबीर
तीन दिवसांपूर्वी अशाच प्रकारे आझाद मैदान परिसरात असलेल्या एका पानटपरी चालकाला त्याने गुन्हे शाखेचा अधिकारी असल्याचे सांगत दुकानाचा परवाना विचारला. त्यानंतर या पानटपरी चालकाला एका टॅक्सीत बसवून त्याच्याकडून साडेआठ हजार रूपये घेतले. याबाबत पानटपरी चालकाने आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार आझाद मैदान पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लीलाधर पाटील आणि त्यांच्या पथकाने या आरोपीचा शोध घेऊन डोंबिवली परिसरातून त्याला अटक केली आहे. आरोपीवर अशाच प्रकारे शहरातील विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असून पोलीस अधिक तपास करत आहेत.