मुंबई : असुरक्षित लैंगिक संबंधामुळे वाढणारे एचआयव्ही आणि सिफिलीस यांचे संक्रमण रोखण्यासाठी राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांतर्गत मुंबईमध्ये मागील तीन वर्षामध्ये गर्भवती महिला, उच्च धोका असलेल्या व्यक्ती आणि सर्वसामान्य व्यक्तींच्या तपासण्या करण्यावर भर दिला आहे. तीन वर्षांत सिफिलीसच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून या रुग्णांचा शोध घेण्यात मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेला यश आले आहे.
एचआयव्ही आणि सिफिलीसचे संक्रमण रोखून त्याचे निर्मूलन करण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेमार्फत राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमांतर्गत अधिकाधिक नागरिकांच्या तपासण्या करण्यावर भर देण्यात आला आहे. यामध्ये गर्भवती महिला, रुग्णालयात विविध उपचारांसाठी येणारे रुग्ण, संक्रमणाचा अधिक धोका असलेल्या व्यक्ती यांच्या रक्ताची तपासणी करण्यात येते. मागील तीन वर्षांमध्ये मुंबईमध्ये या तपासण्यांचे प्रमाण वाढविण्यात आल्याने सिफिलीसचे अधिकाधिक रुग्ण शोधण्यात यश आले आहे. मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेने माहिती अधिकारात दिलेल्या आकडेवारीनुसार २०२२ मध्ये १ लाख ७१ हजार ५९७ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यातील १७९५ नागरिकांना सिफिलीस झाल्याचे आढळले. तर २०२३ मध्ये २ लाख ९ हजार ६०८ नागरिकांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या, त्यापैकी ३०३६ जणांना सिफिलीस झाल्याचे आढळले. या दाेन वर्षांमध्ये रुग्णांच्या संख्येत जवळपास दुपटीने वाढ झाली असून चाचण्यांची संख्याही वाढली आहे. त्याचप्रमााणे मे २०२४ पर्यंत मुंबईमध्ये १ लाख १ हजार ४९७ नागरिकांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यापैकी १ हजार १९३ बाधित रुग्ण आढळले.
हेही वाचा : मुंबई : बलात्कार प्रकरणातील आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक
गर्भवती महिलांमध्ये प्रमाण वाढतेय
गर्भवती महिलांमध्ये सिफिलीसची मोठ्या प्रमाणावर बाधा झाल्याचे आढळले. २०२२ मध्ये ६७ हजार ३०६ गर्भवती महिलांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी ११४ महिलांना सिफिलीस झाल्याचे आढळले. २०२३ मध्ये चाचण्या केलेल्या ६७ हजार ३७७ पैकी २०६ महिलांना सिफिलीस झाल्याचे निदर्शनास आले. मे २०२४ पर्यंत २८ हजार ८०९ गर्भवती महिलांच्या तपासण्या केल्या असता ९५ महिला बाधित आढळल्या.
काय आहेत लक्षणे
सिफिलीसच्या लक्षणांमध्ये ताप, त्वचेवर पुरळ उठणे, वजन कमी होणे, केस गळणे, घसा खवखवणे, थकवा, स्नायू दुखणे, डोकेदुखी, लिम्फ नोड्स सुजणे इत्यादी लक्षणे आढळतात. तसेच गर्भवती महिलेला सिफिलीसची लागण झाल्यास तिच्या बाळामध्येही याचे संक्रमण होऊ शकते. बाळामध्ये संक्रमण झाल्यास जन्मावेळी मृत्यू आणि वजन कमी होण्याची शक्यता असते.
हेही वाचा : ऑनलाईन फसवणूक करणाऱ्यांच्या जाळ्यात आता पोलीस अधिकारी
सिफिलीस हा लैंगिक संबंधातून संक्रमित होणारा आजार असल्याने असुरक्षित लैंगिक संबंध टाळावेत. सिफिलीसवर उपचार करण्यासाठी मुंबईमध्ये विविध रुग्णालांमध्ये २७ सुरक्षा केंद्र आहेत. या केंद्रांवर मोफत उपचार केले जातात. लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांनी केंद्राला भेट देऊन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
डॉ. विजय कुमार करंजकर, अतिरिक्त प्रकल्प संचालक, मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटी