मुंबई : मालाड येथील २६ वर्षीय डॉक्टरने ऑनलाईन मागवलेल्या बटरस्कॉच आईस्क्रीमच्या कोनमध्ये मानवी बोटाचा तुकडा सापडल्याची धक्कादायक घटना घडली होती. तो बोटाचा तुकडा पुण्यातील आईस्क्रीम कारखान्यातील कामगाराचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. ११ मे रोजी अपघातात त्याचे बोट कापले होते.
ओमकार पोटे (२४) असे कामगाराचे नाव असून तो मूळचा साताऱ्याचा आहे. तो पुण्यातील इंदापूर येथील आईस्क्रीम कारखान्यात कार्यरत आहे. तो ११ मे रोजी या अपघातानंतर रुग्णालयात भरती झाला होता. आईस्क्रीममध्ये सापडलेला बोटाचा तुकडा पोलिसांनी तपासणीसाठी न्यायावैधक प्रयोगशाळेत पाठवला आहे. डीएनए चाचणीत तो बोटोचा तुकडा पोटे यांचा असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलीस याप्रकरणी सुपरवायझरविरोधात कारवाई करण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…हिजाब बंदीचा आदेश एकसमान वस्त्रसंहितेसाठी, चेंबूरस्थित महाविद्यालयाचा उच्च न्यायालयात दावा
तक्रारदार डॉ. ब्रँडन फेर्राव यांनी रशियातून एमबीबीएसची पदवी मिळवली असून ते नानावटी रुग्णालयात कामाला होते. सध्या ते पदव्युत्तर शिक्षण घेत असून ते घरी अभ्यास करीत होते. त्याच्या बहिणीने १२ जून रोजी सकाळी ऑनलाईन वस्तू पुरवणाऱ्या कंपनीमार्फत आइस्क्रीमच्या तीन कोनसह अन्य काही किराणा वस्तू मागवल्या होत्या. पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार दुपारी आईस्क्रीम खात असताना त्यात मांसाचा तुकडा सापडला. तो तुकडा त्यांनी काळजीपूर्वक पाहिला असता तो नखासह बोटाचा तुकडा असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
हेही वाचा…नर्सिंगच्या प्रवेशासाठी लागणार चुरस, बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमाच्या सीईटीचा निकाल जाहीर
या प्रकारानंतर तात्काळ त्यांनी आईस्क्रीम उत्पादक कंपनीच्या ग्राहक सेवा विभागाशी संपर्क साधून तक्रार केली. परंतु कंपनीकडून तत्काळ प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी मालाड पोलिसांशी संपर्क साधला आणि आईस्क्रीममध्ये सापडलेला मांसाचा तुकडा त्यांना दाखवला. आईस्क्रीम वितळण्याआधी त्याने पोलीस तक्रार नोंदवण्याआधी त्याचे छायाचित्र व चित्रफीत तयार केली होती. डॉक्टरांच्या तक्रारीवरून, मालाड पोलिसांनी अनोळखी कर्मचाऱ्याविरूद्ध भादंवि कलम २७२ (खाद्यपदार्थात भेसळ करणे), २७३ (हानीकारक बनलेले खाद्यपदार्थ किंवा पेय विकणे) आणि ३३६ (मानवी जीव धोक्यात घालणारे कृत्य) अन्वये गुन्हा दाखल केला होता.