डॉ. तडवी यांनी मृत्युपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतील नोंदीतून स्पष्ट
मुंबई : डॉ. हेमा अहुजा, डॉ. अंकिंता खंडेलवाल आणि डॉ. भक्ती मेहेर या तिघींच्या छळ अस झाल्यानेच आपण आत्महत्या करत असल्याचे आणि या तिघीच आपल्या आत्महत्येसाठी जबाबदार असल्याचे डॉ. पायल तडवी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केले आहे.
डॉ. तडवी यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीचे छायाचित्र त्यांच्या भ्रमणध्वनीत सापडले. कलिना येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत त्यांच्या भ्रमणध्वनीची तपासणी करतेवेळी हे छायाचित्र सापडले. पोलिसांनी मंगळवारी या प्रकरणी तिन्ही महिला डॉक्टरांवर डॉ. तडवी यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी १८०० पानी आरोपपत्र दाखल केले. त्यात डॉ. तडवी यांनी लिहिलेल्या पाच पानी चिठ्ठीचा प्रमुख पुरावा म्हणून समावेश आहे. डॉ. तडवी यांनी या चिठ्ठीत त्यांच्या आत्महत्येस तिन्ही आरोपी डॉक्टर कशा जबाबदार आहेत हे सविस्तर लिहिले आहे. गुन्हे शाखेच्या दृष्टीने ही चिठ्ठी हा खटल्याला भक्कम करणारा पुरावा ठरणार असल्याचे मानले जात आहे. डॉ. तडवी यांच्या या चिठ्ठीची प्रत गुरुवारी उपलब्ध झाली.
या चिठ्ठीच्या सुरुवातीलाच डॉ. तडवी यांनी आत्महत्या करून आयुष्य संपवत असल्याबाबत आईवडिलांची माफी मागितली आहे. परंतु रुग्णालयातील त्यांचे आयुष्य एवढे अस झाले आहे की त्यांच्यापुढे आयुष्य संपवण्याशिवाय पर्याय नसल्याचे म्हटले आहे. त्याचवेळी आपल्याला या निर्णयापर्यंत (आत्महत्येच्या) आणण्यासाठी आपल्या तीन वरिष्ठ डॉ. हेमा अहुजा, डॉ भक्ती मेहेर आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या जबाबदार आहेत, असेही डॉ. तडवी यांनी लिहिले आहे. या तिघीही माझ्या आणि स्नेहल शिंदे (डॉ. तडवी यांची मैत्रिण आणि प्रकरणातील मुख्य साक्षीदार) हिच्या स्थितीसाठी जबाबदार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या तिघी आपल्याला देत असलेल्या वागणुकीची मी आणि स्नेहलने अनेकदा वरिष्ठांकडे तक्रार केली. परंतु काहीही कारवाई केली गेली नाही, असेही डॉ. तडवी यांनी चिठ्ठीत लिहिले आहे.
याशिवाय कधीतरी डॉ. हेमा, डॉ. भक्ती, डॉ. अंकिता यांची ही वागणूक बदलेल आणि आपला छळ संपेल या आशेने गेले वर्षभर मी आणि स्नेहल त्यांचा छळ सहन करत होतो. परंतु याला काही अंत नाही आणि त्यातून काहीही मार्ग दिसत नाही. आवश्यक ते सगळे प्रयत्न केल्यानंतर आपण आत्महत्येच्या निर्णयापर्यंत पोहोचलो आहोत. त्यांच्या या छळाविरोधात आपल्या बाजूने कोणीही उभे राहणार नाहीत, आपल्याला साथ देणार नाही. माझी आणि स्नेहलची काहीही चूक नसताना डॉ. हेमा, डॉ. भक्ती आणि डॉ. अंकिता या तिघींनी आम्हाला रुग्ण, कर्मचारीवर्ग आणि अन्य डॉक्टरांसोबत अनेकदा अपमानित केले. या रुग्णालयात असेपर्यंत आम्ही तुम्हाला काहीही शिकू देणार नाही, असे या तिघींनी जाहीर केले आहे. त्यामुळे माझे व्यावसायिक आणि व्यक्तिगत आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. आपण कामात चोख नसल्याचा दावा करत या तिघींनी कधीही आपल्याला प्रसुतीगृहात जाऊ दिले नाही. परिस्थिती बदलण्याचे सगळे प्रयत्न केले. परंतु त्यात काहीच फरक पडला नाही. उलट मीच मानसिकदृष्टय़ा अस्थिर झाले. रुग्णालयातील वातावरण हे कामासाठी योग्य नाही आणि येथील परिस्थिती कधीच बदलणार नाही हे मला माहीत आहे. त्यामुळेच ती बदलेल याची आशाही मी सोडली आहे, असेही डॉ. तडवी यांनी लिहिले आहे. चिठ्ठीच्या शेवटी डॉ. तडवी यांनी स्नेहलला एकटीला या तिघींचा छळ सहन करण्यासाठी सोडून जात असल्याबाबत तिची माफी मागितली आहे.