मुंबई : देवनारमध्ये कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याच्या मुंबई महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची क्षमता वाढवण्यात आली आहे. मूळ कंत्राटात कचऱ्यापासून प्रतिदिन ४ मेगावॉट वीजनिर्मिती करण्यात येणार होती. मात्र त्याच कंत्राटांतर्गत आता प्रतिदिन ७ मेगावॉट वीजनिर्मिती करण्यात येईल. हा प्रकल्प पुढीलवर्षी ऑक्टोबर २०२५ मध्ये कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
पालिकेच्या देवनार क्षेपणभूमी येथे सध्या तब्बल २० दशलक्ष मेट्रीक टन जुना कचरा जमा झाला आहे. देवनार कचराभूमी शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला दिले होते. त्या अंतर्गत पालिकेने तेथे कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प उभारण्याचे ठरवले होते. गेल्या आठ-दहा वर्षांपासून पालिकेचे त्यासाठी प्रयत्न सुरू होते.
हेही वाचा – ३ जानेवारीला पृथ्वी ते सूर्याचे अंतर राहणार सर्वांत कमी !
२०१४ मध्ये एकाचवेळी तीन हजार मेट्रीक टन कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प उभारण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. मात्र त्याला प्रतिसाद न मिळाल्यामुळे मग छोट्या क्षमतेचे तीन प्रकल्प उभारण्याचे ठरवले. त्यानुसार ६०० मेट्रीक टन कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प उभारण्याचे निश्चित झाले आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबवून नोव्हेंबर २०२० मध्ये कार्यादेश देण्यात आले होते. त्यानंतर या प्रकल्पासाठी पर्यावरणीय, किनारपट्टी नियमन क्षेत्र परवानगी, एमपीसीबीची परवानगी घेण्याची कार्यवाही पार पडली. या प्रकल्पाची आखणी व बांधकामाला २०२२ पासून सुरुवात झाली असून हा प्रकल्प पुढील वर्षी ऑक्टोबर २०२५ पासून कार्यान्वित होणार आहे.
हेही वाचा – मजुरांच्या माध्यमातून २ हजारांच्या नोटा बदलवण्याचे रॅकेट, ‘दिल्ली ‘कनेक्शन’
वीजनिर्मितीची क्षमता वाढवणार
ऑक्टोबर २०२५ मध्ये प्रकल्प सुरू होण्याची शक्यता आहे. प्रकल्पातून मिळणाऱ्या विजेचा वापर पालिकेच्या भांडूप संकुलातील विविध विद्युत यंत्रणांसाठी केला जाणार आहे.
कचऱ्यापासून वीजनिर्मिती
● तंत्रज्ञान – विंड्रो कंपोस्टिंग आणि इन्सिनरेशन
● अपेक्षित वीजनिर्मिती – ७ मेगावॉट (निव्वळ वीजनिर्मिती १७ दशलक्ष युनिट्स प्रतिवर्ष)
● क्षेत्र – १२.१९ हेक्टर
● सद्यास्थिती – बांधकाम आणि उभारणीचे काम प्रगतिपथावर
● प्रकल्प ऑक्टोबर २०२५ पर्यंत कार्यान्वित होणे अपेक्षित.