मुंबई – लायन गेट, विधान भवन परिसर, फॅशन स्ट्रीट, बाणगंगा, गिरगाव दर्शक गॅलरी अशा पर्यटन स्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी मुंबई महापालिकेने १४ वातानुकूलित प्रसाधनगृहे बांधण्याचे ठरवले आहे. त्यातील तीन शौचालयांसाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. ही शौचालये वातानुकूलित असतील तसेच तेथे आवश्यक सर्व सुविधा असतील. शौचालये बांधण्यासाठी शहर भागात १४ जागांची निवड करण्यात आली आहे. यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून (डीपीडीसी) निधी दिला जाणार असून ३५ कोटी रुपये खर्च केला जाणार आहे.
मुंबई शहरातील पर्यटन स्थळांना भेटी देण्यासाठी देश विदेशातील पर्यटक येत असतात. मात्र त्या पर्यटन स्थळांच्या ठिकाणी चांगल्या स्थितीतील शौचालयांची सुविधा नसल्याने पर्यटकांना, विशेषतः महिलांना गैरसोयींना सामोरे जावे लागते. मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पर्यटनस्थळी शौचालये बांधण्याची सूचना केली होती. त्यानुसार पालिका प्रशासनाने आता पर्यटनस्थळी सोयीसुविधांनी युक्त अशी वातानुकूलित प्रसाधनगृहे तयार करण्याचे ठरवले आहे. मुंबईत १४ ठिकाणी अशी प्रसाधनगृहे सुरू केली जाणार असून त्यासाठी ३५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. तीन ठिकाणी शौचालयांच्या बांधकामासाठी निविदा काढण्यात आली आहे.
मुंबईतील १४ ठिकाणांपैकी दक्षिण मुंबईत पाच ठिकाणी, ग्रॅंटरोड परिसरात २, वरळी प्रभादेवीत ३, माहीम धारावीत २ आणि भायखळा आणि शीव परिसरात प्रत्येकी एका ठिकाणी ही शौचालये बांधली जाणार आहेत. या स्वच्छतागृहांच्या देखभालीसाठी महापालिकेने एटीएम, खाद्यपदार्थांचे स्टॉल तयार करून त्यातून स्वच्छतागृहांच्या देखभालीचा खर्च भागवण्याचा आराखडा तयार केला आहे.
पर्यटकांसाठी येथे शौचालये बांधणार –
ठिकाण – शौचकूप
लायन गेट – १७
विधानभवन – २०
उच्च न्यायालयासमोर – २६
फॅशन स्ट्रीट – १४
गिरगाव, दर्शक गॅलरी – २०
बाणगंगा – १४
राणीबागजवळ – २०
हायवे अपार्टमेंट सायन – २०
हाजी अली जंक्शन – १६
सिद्धीविनायक मंदिर परिसर, सानेगुरुजी मैदान – २०
वरळी लिंक मार्ग – १६
माहिम रेती बंदर – १४
धारावी – ६०
फिट रोड – १८