मान्सून दाखल झाल्यानंतर पहिल्याच पावसात मुंबई तुंबली. मुंबई आणि उपनगरांतील अनेक भागात पाणी साचलं. तर लोकल सेवेवरही परिणाम झाला. त्यामुळे पहिल्या पावसात मुंबईत पाणी साचल्यानं नालेसफाईचे दावे करणाऱ्या महापालिका प्रशासनाला आणि सत्तेत असलेल्या शिवसेनेला विरोधकांकडून प्रश्न विचारले जात आहे. यावरून वाद प्रतिवाद सुरू असतानाच मुंबईतील शिवसेना आमदाराने एका कंत्राटदाराला कचऱ्यानं अघोळ घातली. हा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल झाला असून, या घटनेची सगळीकडे चर्चा होत आहे. या सर्व प्रकारावर चांदिवलीचे शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी स्वतःची भूमिकाही मांडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईत तीन-चार दिवस मुसळधार पाऊस बरसला. पावसाचा जोर जास्त असल्यानं मुंबईतील अनेक भागांत पाणी भरलं होतं. पहिल्याच पावसात पाणी साचल्यानं नालेसफाईबद्दल सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येणाऱ्या दाव्यांवर बोट ठेवत विरोधकांकडून टीका केली जात आहे. नालेसफाईवरून शिवसेनेला प्रश्न विचारले जात असतानाच रविवारी शिवसेना आमदाराचा व्हिडीओ व्हायरल झाला.

हेही वाचा- मुंबईत पाऊस कमी, तरीही रस्ते पाण्यात; लोकल विस्कळीत

चांदिवलीचे शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी चक्क महापालिकेच्या कंत्राटदाराला कचऱ्यानं अंघोळ घातल्याच्या घटनेचा हा व्हिडीओ होता. एएनआय वृत्तसंस्थेनंही हा व्हिडीओ ट्विट केला असून, व्यवस्थित नालेसफाई न केल्यानं आमदार दिलीप लांडे चांगलेच संतापलेले दिसत आहे. तसंच रागाच्या भरात त्यांनी कंत्राटदाराला खाली बसवलं. त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांना कंत्राटदारावर कचरा टाकायला सांगितला. त्यानंतर कार्यकर्त्यांनी रस्त्यावर साचलेला कचरा त्यांच्या अंगावर टाकला. यावेळी कंत्राटदार आमदारांशी बोलताना दिसत आहे. तसंच रस्त्यावर पाणी तुंबलेलं असल्याचं आणि बराच कचरा साचलेलाही व्हिडीओत दिसत आहे.

आमदार दिलीप लांडे म्हणतात…

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लांडे यांच्यावर काहीजण टीका करतानाही दिसत आहेत. कंत्राटदाराला दिलेल्या वागणुकीवर आमदार दिलीप लांडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “कंत्राटदार त्याचं काम जबाबदारीनं करत नसल्यानं मी हे केलं आहे. मी मागील १५ दिवसांपासून कंत्राटदाराशी संपर्क करतोय. रस्त्याची सफाई करण्याची विनंती करतोय. मात्र, त्याने हे काम केलंच नाही. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रस्ता साफ करण्याचं कामं सुरू केल्यानंतर तो तिथे आला. नंतर मी त्याला सांगितलं की, ही तुझी जबाबदारी आहे आणि त्याने ते काम केलं पाहिजे,” असं म्हणत लांडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

पूर्व मोसमी सरींना असलेला जोर, नियोजित वेळेच्या दोन दिवस आधीच मुंबईत दाखल झालेला मोसमी पाऊस, या कारणांमुळे मुंबईत यावर्षी पावसाने जून महिन्याची सरासरी पहिल्या १० दिवसांतच ओलांडली आहे. हवामान विभागाच्या नोंदीनुसार मुंबई उपनगरातील पावसाची सरासरी संपूर्ण जून महिन्यासाठी ५०५ मिलीमीटर आहे; मात्र यंदा १ ते ११ जून, सकाळी ८.३० वाजेपर्यंत उपनगरात ५३४.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai drainage cleaning dump garbage on contractor chandivali shiv sena mla drainage cleaning bmh
Show comments