मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांमधील मोठ्या व लहान नाल्यांमधून आतापर्यंत उद्दीष्टापेक्षा जास्त गाळ काढण्यात आल्याचा दावा मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केला आहे. वडाळा ट्रक टर्मिनस येथील न्यू म्हाडा ट्रान्झिट कॅम्प भागातील कोकरे नाल्यातील गाळ आणि तरंगता कचरा मे महिन्यातच काढण्यात आला होता. मात्र या नाल्यांमध्ये तरंगता कचरा आढळून आला असून तो लवकरच काढण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, या नाल्यातील गाळ काढलाच नसल्याचा आरोप माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागातर्फे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी मुंबईतील मोठ्या नाल्यांमधील, तर विभाग कार्यालयांच्या वतीने लहान नाल्यांमधील गाळ काढण्यात येतो. मुंबई महानगरातील पर्जन्यमान आणि पावसाची तीव्रता याचा अंदाज लक्षात घेऊन, नाल्यांमधून किती गाळ काढणे आवश्यक आहे, याचा अभ्यास करून दरवर्षी गाळ उपशाचे उद्दिष्ट निश्चित केले जाते. त्यानुसार, वार्षिक उद्दिष्टापैकी पावसाळ्यापूर्वी म्हणजे ३१ मेपर्यंत मोठ्या नाल्यातील ७५ टक्के गाळ काढण्याचे उद्दिष्ट होते. या उद्दिष्टानुसार ३१ मेपर्यंत विविध नाल्यांमधून १० लाख २२ हजार १३१ दशलक्ष टन इतका गाळ काढण्यात आला आहे. पावसाळ्यादरम्यान म्हणजे १ जूनपासून नाल्यांमधून १५ टक्के काढण्याचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार, १ जून ते २१ जून २०२४ दरम्यान विविध नाल्यांमधून एकूण १ लाख १५ हजार ४७३ दशलक्ष टन इतका गाळ काढण्यात आला आहे. तर, पावसाळ्यानंतर उर्वरित १० टक्के गाळ काढण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

हेही वाचा : मुलुंडमधील १७ इमारती टँकरच्या पाण्यावर अवलंबून, कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने रहिवासी हैराण

पावसाळ्यापूर्वीची नालेसफाईची कामे १०० टक्क्क्यांपेक्षा जास्त झाल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला होता. मात्र अनेक ठिकाणचे नाले कचऱ्याने तुडुंब भरले असल्याचा आरोप माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला होता. वडाळा येथील कोकरे नाल्याची त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसोबत पाहणी केली असता नाल्यात कचरा असल्याचे आढळून आले होते. मात्र हा नाला आधी साफ करण्यात आला होता. परंतु, नागरिकांनी नाल्यात पुन्हा कचरा टाकल्याने तो तरंगत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. हा कचरा लवकरच काढण्यात येईल, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

पावसाळ्यातील नालेसफाईची कामे ४३ टक्के

पावसाळ्यात नाल्यातून १५ टक्के गाळ काढण्याचे उद्दीष्ट्य ठेवण्यात आले आहे. पावसाळ्याच्या चार महिन्यात दोन लाख ३५ हजार मेट्रीक टन गाळ काढण्यात येणार आहे. १ जूनपासून आतापर्यंत ४३ टक्के गाळ काढण्यात आला आहे.

हेही वाचा : पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केलेल्या १८ हजार कोटींच्या अटल सेतूला तडे; नाना पटोलेंनी समोर आणली दुरवस्था

नदी, नाल्यात कचरा किंवा राडारोडा टाकू नका, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

पावसाळापूर्वी विविध भागांतील लहान-मोठ्या नाल्यांतील गाळ काढण्यात आला आहे. मात्र आसापासचे नागरिक वारंवार नाल्यांमध्ये कचरा टाकत असल्याचे आढळून येते. त्यामुळे नदी, नाल्यांमध्ये कचरा वा राडारोडा टाकल्यास पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण होऊन मुसळधार पाऊस कोसळताच पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे, नागरिकांनी नदी किंवा नाल्यात कचरा, राडारोडा टाकू नये, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai drains pump more silt than target claims municipal administration mumbai print news css
Show comments