मुंबई : कृत्रिम पायात लपवून सोन्याची तस्करी करणाऱ्या दोन प्रवाशांना महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) अटक केली. आरोपी थायलंडवरून मुंबईत आले होते. त्यांच्याकडून साडे सहा किलो सोने जप्त करण्यात आले असून त्याची किंमत सहा कोटी ३० लाख रुपये असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.थायलंडवरून सोन्याची तस्करी करण्यात येणार असल्याची माहिती डीआरआयला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे डीआरआयने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर सापळा रचला होता. त्यावेळी व्हील चेअरवरून आलेला एक प्रवासी व त्याचा साथीदार दोघे ग्रीन चॅनेलपुढे आले.

अपंग व्यक्तीच्या बुटामध्ये धातू असल्याचे निष्पन्न झाले. त्या माहितीच्या आधारे तपासणी केली असता लाल कागदात सोने लपवले असल्याचे निष्पन्न झाले. त्याचे एकूण वजन ६७३५ ग्रॅम होते. जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत सहा कोट ३० लाख रुपये असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. त्यानुसार डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी सीमाशुल्क कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी भरत चमनलाल शेठ (७१) व चिंतन संघवी यांना अटक केली. शेठ हा शिवडी, तर संघवी हा परळ येथील रहिवासी आहे.

सोने तस्करीसाठी कोणत्या क्लृप्त्या लढवल्या जातात?

सोने तस्करीसाठी विविध क्लृप्त्या लढवल्या जातात. चॉकलेटचा थर चढवलेले सोने वेष्टनात दडवून तस्करी केली जाते. याशिवाय गृहउपयोगी वस्तू, लॅपटॉप, हेअर ड्रायरसारख्या वस्तूंमध्ये सोने लपवूनही त्याची तस्करी केली जाते. सध्या शरीरात, अंतर्वस्त्रांमध्ये लपवूनही सोन्याची तस्करी केली जाते. सोन्याची भुकटी कॅप्सूलमध्ये लपवून ती गिळूनही तस्करी केली जाते. त्याशिवाय सोन्याची भुकटी करून मेणात लपवून त्याची तस्करी केली जाते, असे अधिकाऱ्याने सांगितले.

सोन्याची तस्करी का केली जाते?

भारतात सोन्याला अधिक मागणी आहे. त्यासाठी सोने आयात करण्याचेही पर्याय उपलब्ध आहेत. त्यासाठी सरकारने दिलेल्या परवान्याची आवश्यकता असते. आयात केलेल्या सोन्यावर सीमाशुल्क आणि इतर शुल्कासह सुमारे २५ टक्के रक्कम भरावी लागते. तसेच आयात करण्यासाठी काळ्या पैशांचा वापर केल्यास अटक होऊ शकते. पण तस्करी मार्गे सोने भारतात आणले, तर एका किलोमागे लाखो रुपये फायदा होता. तसेच काळ्या पैशांचा वापर तस्करीत करून चलनात आणता येऊ शकतो. त्यामुळे आयातीचा पर्याय उपलब्ध असतानाही सोन्याची तस्करी केली जाते.