मुंबई : भारतीय तालवाद्याचा ताल आणि चैतन्य यासाठी ओळखल्या जाणाऱ्या ‘मुंबई ड्रम डे’ या वार्षिक महोत्सवाचे आयोजन मुंबईत करण्यात आले आहे. जगप्रसिद्ध पियानिस्ट ल्युईस बँक्स यांचे पुत्र आणि आघाडीचे तालवाद्य कलाकार जीनो बँक्स यांच्या पुढाकाराने दरवर्षी या उत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदा २१ फेब्रुवारी रोजी ‘मुंबई ड्रम डे २०२५’चे आयोजन करण्यात आले आहे.
देशातील प्रत्येक कानाकोपऱ्यातील तालवादकांना एकत्र आणणारा ‘मुंबई ड्रम डे २०२५’ शुक्रवार, २१ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ६.३० वाजता वांद्रे येथील सेंट अॅण्ड्रयूज ऑडिटोरियम येथे होणार आहे. या महोत्सवात त्रिलोक गुर्टू, जीनो बँक्स, जोशुआ वाझ, डेव्हिड जोसेफ, सुयश गॅब्रियल, जीवराज सिंग, मंजुनाथ सत्यशील आदी आघाडीचे तालवाद्य कलाकार सहभागी होणार आहेत. यावेळी प्रख्यात कीबोर्डवादक संगीत हल्दीपूर विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
“भारतीय ड्रमिंगमधील विविधतेतील एकता या कार्यक्रमाच्या माध्यमातून सादर होणार आहे. प्रत्येक ड्रमर आपापला प्रादेशिक प्रभाव आणि वैयक्तिक प्रतिभा व्यासपीठावर सादर करणार आहे. यावेळी एकल सादरीकरण आणि संवादरुपी सत्रेसुद्धा पार पडणार असून त्यांना संगीत हल्दीपूर यांच्या किबोर्डची आणि गायनाचीही साथ असणार आहे. ‘मुंबई ड्रम डे २०२५’चे हे पर्व त्यामुळेच भारतीय संगीत क्षेत्रातील एक आगळेवेगळे ठरणार आहे,” अशी माहिती प्रख्यात तालवाद्य कलाकार आणि महोत्सवाचे आयोजक जीनो बँक्स यांनी दिली. या महोत्सवाची तिकिटे बुक माय शो वर उपलब्ध आहेत.