Drunk Man Chaos In Byculla: भायखळ्याच्या वाय-पुलाजवळ तीन मद्यधुंद व्यक्तींनी पादचाऱ्यांना लुटताना जय श्री राम म्हणत घोषणा देण्यासाठी जबरदस्ती केल्याचे समजतेय. या तिघांना सध्या आग्रीपाडा पोलिसांनी अटक केली आहे. रात्री दारूच्या नशेत फिरताना त्यांनी हा कट रचला. पुलावरून जाणाऱ्या एका अल्पवयीन मुलीशी त्यांनी गैरवर्तन सुद्धा केल्याचे समजतेय. सदर घटना मंगळवारी रात्री घडली असून आता त्यांच्यावर भारतीय दंड संहिता आणि लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायद्यांतर्गत प्राणघातक हल्ला आणि लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे सविस्तर वाचा..
जबरदरस्तीचा ‘श्रीराम जप’
प्राप्त माहितीनुसार, या तीन आरोपींनी प्रथम एका टेम्पो चालकाला लक्ष्य केले, त्याचा मोबाईल फोन हिसकावून घेतला आणि त्याला ‘जय श्री राम’ म्हणण्यास भाग पाडले. त्यानंतर, हा गट भायखळ्यातील वाय-ब्रिजवर गेला, जिथे त्यांनी एका प्रवाशाकडे पैशाची मागणी केली. रोख रक्कम न मिळाल्याने त्यांनी त्या व्यक्तीस मारहाण करून धार्मिक घोषणा देण्यास भाग पाडले. थोड्यावेळाने त्यांना एक तरुणी तिच्या मुलीसह जाताना दिसली. त्यांनी तिच्याकडे पैसे मागितले आणि त्याच वेळी तिच्याबरोबर असलेल्या अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केले.
भायखळा येथील माजी आमदार व AIMIM चे राष्ट्रीय प्रवक्ते वारीस पठाण यांनी सुद्धा सदर घटनेबाबत X वर पोस्ट लिहून पुष्टी केली आहे. आरोपींवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पठाण यांनी सांगितले आहे.
आग्रीपाडा पोलिसांच्या एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, पीडितांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे त्यांच्या चौकशीत घटनेची पुष्टी होताच त्यांना अटक करण्यात आली. अनुज मयेकर, उमेश परब आणि ऋतिक राठोड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे सर्वजण बेरोजगार असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. त्यांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.