मुंबईतील बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित अशा पूर्व मुक्त मार्ग प्रकल्पाच्या ऑरेंज गेट ते चेंबूरच्या शिवाजी पुतळय़ापर्यंतच्या साडेतेरा किलोमीटर लांबीच्या टप्प्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते गुरुवारी उद्घाटन झाले. मात्र, उद्घाटन सोहळय़ासाठी टाकलेला भलामोठा मांडव काढून रस्ता मोकळा करण्यासाठी वेळ लागणार असल्याने शुक्रवार सायंकाळपर्यंत हा रस्ता खुला करण्यात येईल, असे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे सांगण्यात आले. त्यामुळे खऱ्या अर्थाने शनिवार सकाळीपासून हा प्रकल्प ये-जा करण्यासाठी वाहनधारकांना खुला होईल.
पूर्व मुक्त मार्गासारख्या प्रकल्पांमुळे मुंबई हे जागतिक दर्जाचे शहर बनू शकते, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केले.हा प्रकल्प मे महिन्याच्या अखेपर्यंत सुरू होणार होता. पण काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांच्या हस्ते उद्घाटन करण्याच्या प्रयत्नांमुळे तो रखडला होता. याबाबत विचारले असता, मुख्यमंत्री चव्हाण यांनी उद्घाटन लांबल्याचे फेटाळले. काही छोटी-मोठी कामे राहिली होती त्यामुळे उद्घाटन थांबले होते, अशी सारवासारव त्यांनी केली. प्रकल्पाचा पांजरापोळ ते घाटकोपर हा २.८१ किलोमीटरचा जोडरस्ता आणि दुसरा बोगदा आणि पूर्व मुक्त मार्गावर ये-जा करण्यासाठी १२ पैकी उरलेले तीन जोडरस्ते हे डिसेंबर २०१३ पर्यंत पूर्ण होतील, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. उपनगरचे पालकमंत्री नसीम खान, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर, मुंबईचे महापौर सुनील प्रभू, ‘एमएमआरडीए’चे महानगर आयुक्त यूपीएस मदान, महानगरपालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे आदी यावेळी उपस्थित होते.

पूर्व मुक्त मार्गाची वैशिष्टय़े
*    दक्षिण मुंबई ते चेंबूपर्यंतच्या प्रवासासाठी जवळपास अर्धा तास वाचणार.
*    दादर आणि शीव येथील वाहतूक कोंडी कमी होणार.
*    साडेतेरा किलोमीटर लांबीच्या टप्प्याच्या बांधकामासाठी एकूण १६ लाख पोती सिमेंट, ३२ हजार मेट्रिक टन पोलाद, ३३४६ गर्डर आणि २६०० किलोमीटर लांबीची हायटेन्शन स्टील स्ट्रँडचा उपयोग झाला.
* प्रकल्पासाठी दोन हजार कामगार आणि १०० हून अधिक अभियंत्यांची मेहनत व कौशल्य कामी आले.

पूर्व मुक्त मार्गाचा अर्धशतकाचा प्रवास
पूर्व मुक्त मार्ग प्रकल्प १९६३ मध्ये मुंबईसाठी तयार करण्यात आलेल्या र्सवकष वाहतूक आराखडय़ाचा भाग आहे. पण प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरू होण्यास २००८ उजाडले आणि आता जून २०१३ मध्ये प्रकल्पाचे उद्घाटन झाले. म्हणजेच आखणी ते प्रकल्प कार्यान्वित होईपर्यंत पूर्व मुक्त मार्ग प्रकल्पाला तब्बल ५० वर्षांचा प्रवास करावा लागला.

आंबेडकरांचे नाव देण्याची मागणी
मुक्त मार्गाच्या उद्घाटनाची औपचारिकता पूर्ण होताच या मार्गाला
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी सुरू झाली. मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या काही कार्यकर्त्यांनी ही मागणी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी मात्र काहीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.

वाहतूक पोलिसांचा कस लागणार
मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासातील मोलाचा वेळ वाचवणाऱ्या पूर्व मुक्तमार्गावरून आता वाहतूक पोलिसांचा कस लागणार आहे. या मार्गावर वाहतूक पोलिसांचा वावर नसला, तरीही दोन्ही बाजूंना पोलिसांचा चोख बंदोबस्त असेल. तसेच या मार्गामुळे इतर मार्गावर होणारा चांगला परिणाम लक्षात घेता सिग्नल यंत्रणेत फेरफार करण्याचे कामही वाहतूक पोलिसांना करावे लागणार आहे. मात्र मुक्तमार्गाच्या जोडमार्गाजवळ पोलिसांचा बंदोबस्त असण्याची शक्यता कमी आहे. पूर्व मुक्तमार्ग गुरुवारी खुला होणार, या बातमीने गुरुवारी संध्याकाळीच शेकडो वाहनांची चाके या मार्गाच्या दिशेने वळली आणि वाडीबंदर ते छत्रपती शिवाजी टर्मिनस या टप्प्यात वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे येत्या काळात हा मार्ग वापरता झाला की, वाहतूक पोलिसांचा कस लागणार, हे पहिल्याच दिवशी स्पष्ट झाले. पूर्व मुक्तमार्गावर वेगमर्यादेवर नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा लक्ष ठेवण्यासाठी सध्या तरी कोणतीही प्रणाली वाहतूक पोलिसांकडे नसल्याचेही सूत्रांकडून समजते. या आठवडाभरात मुक्तमार्गावरील रहदारीचा इतर मार्गावर काय परिणाम होत आहे, याचा विचार सिग्नलच्या वेळा कमी-जास्त करणे, आवश्यक त्या ठिकाणी सिग्नल बसवणे, ही कामे  केली जातील, असे सह पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी सांगितले.