मुंबई : आर्थिक गुन्हे शाखेमार्फत टोरेस घोटाळ्याप्रकरणी तपास सुरु असून कांदिवलीतील पोईसर भागातील टोरेसच्या कार्यालयावर सोमवारी गुन्हे शाखेने छापा टाकला. पोईसरमध्ये २९ डिसेंबर रोजी टोरेसची सहावी शाखा सुरु करण्यात आली होती. घोटाळ्याचा उलगडा झाल्यामुळे आठवड्याभरात शाखेला टाळे लागले. त्यामुळे या कार्यालयावर टाकलेल्या छाप्यामुळे काही नवीन बाबींचा उलगडा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
टोरेस घोटाळ्याप्रकरणी दिवसेंदिवस नवीन बाबी समोर येत आहेत. टोरेसमध्ये हजारो, लाखो रुपयांची गुंतवणूक केलेल्या नागरिकांना अद्यापही दिलासा मिळालेला नाही. अद्यापही पोलीस ठाण्यात खेपा मारत रक्कम परत मिळवण्यासाठी गुंतवणूकदारांचे प्रयत्न सुरूच आहेत. संबंधित प्रकरणाचा संपूर्ण तपास आर्थिक गुन्हे शाखा करत असून टोरेसच्या मुंबईतील सर्व कार्यालयांतून साधारण ९ कोटींहून अधिक मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कांदिवलीतील पोईसर भागात २९ डिसेंबर रोजी टोरेसने नव्या शाखेचे उदघाटन केले. मात्र, केवळ आठवड्याभरातच ही शाखा बंद झाली. त्यामुळे ही शाखा दुर्लक्षित होती. आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी या शाखेवर छापा टाकल्यामुळे आणखी नव्या बाबी समोर येण्याची शक्यता आहे. या शाखेबाबत आणखी चौकशी केली जात आहे.
हेही वाचा…कुटुंबाचा विरोध असलेल्या आंतरजातीय जोडप्याचे संरक्षण करा, उच्च न्यायालयाचे पोलिसांना आदेश
दरम्यान, अद्यापही टोरेसचे संकेतस्थळ आणि ॲप सुरूच आहेत. गुंतवणूकदारांना दररोज या ॲपवरून वेगवेगळी माहिती दिली जात आहे. त्यामुळे हे ॲप नेमके कोण आणि कुठून चालवत आहे, आदी अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. तसेच, एवढा मोठा घोटाळा होऊनही पोलिसांनी ॲप बंद का केले नाही, असाही प्रश्न गुंतवणूकदारांना पडला आहे. ॲपवरून पैसे परत मिळतील, अशी हमी अजूनही गुंतवणूकदारांना दिली जात आहे.
टोरेसचा सीईओ दहावी नापास
हजारो गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक केलेल्या टोरेस कंपनीने केवळ अशिक्षित कर्मचाऱ्यांचीच नेमणूक केली होती. दादर येथील कार्यालयात मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून चक्क दहावी नापास असलेल्या तौसिफ रियाज या तरुणाची नियुक्ती करण्यात आली होती. पोलीस तपासातून ही बाब समोर आली. तौसिफ याच कार्यालयात पूर्वी गुंतवणूकदारांच्या आधार कार्डच्या झेरॉक्स काढण्याचे काम करत होता. दादरमधील कार्यालय २५ लाख रुपयांमध्ये उपलब्ध करून दिल्यामुळे त्याला कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी करण्यात आले होते. तसेच, पेहराव बदलून पदाला साजेसे कपडे घालण्यासही त्याला सांगण्यात आले होते.