मुंबई : ऑक्टाएफएक्स व त्याच्याशी संबंधित इतर संस्थांविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. याप्रकरणी 20 डिसेंबरला विशेष न्यायालयाने पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते. २४ डिसेंबरला त्याची न्यायालयाने दखल घेतल्याचे ईडीकडून सांगण्यात आले. भारतीतील व्यवहारांद्वारे ऑक्टाएफएक्सने नऊ महिन्यांमध्ये ८०० कोटी रुपये जमा केल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले.
पुण्यातील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात ॲप आणि त्याच्या प्रवर्तकांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्याच्या आधारे ईडी याप्रकरणात तपास करीत आहे. ऑक्टाएफएक्स ॲप आणि वेबसाईटवरून परदेशी चलनाचे व्यवहार करण्यासाठी आरबीआयकडून परवानगी घेण्यात आली नव्हती. तरीसुद्धा, प्लॅटफॉर्मचा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार करण्यात आला.
विदेशी मुद्रा व्यापार सुलभ करण्याच्या नावाखाली गुंतवणुकदारांना ऑक्टाएफएक्स ट्रेडिंग ॲप आणि वेबसाईटवर विविध भारतीय बँकांची मोठ्या प्रमाणात खाती दाखवली जात होती. त्यात मोठ्या प्रमाणात फेरफार करण्यात आला होता. ईडीने कंपनी आणि तिच्या प्रवर्तकांच्या मुंबई, चेन्नई, कोलकाता आणि दिल्ली येथील मालमत्तांवर एप्रिलमध्ये छापा टाकला होता. याप्रकरणात गुंतवणुकदार, वापरकर्त्यांची फसवणूक करून गोळा केलेले पैसे ई-वॉलेट खात्यांमध्ये किंवा तोतया संस्थांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आल्याचा संशय आहे.
हेही वाचा…कृती आराखड्यासाठी मुख्यमंत्री आग्रही; प्रत्येक खात्याला १०० दिवसांचे ठोस नियोजन करण्याचे निर्देश
ऑक्टाएफएक्स इंडिया प्रा. लि. ऑक्टाएफएक्स आणि त्यांच्या संस्थांनी परकीय चलन व्यापाराच्या नावाखाली ८०० कोटींहून अधिक रक्कम जमा केली. प्रकरण उघडकीस आल्यावर १६५ कोटींच्या मालमत्तांवर टाच आणण्यात आली असून त्यात १९ मालमत्ता स्पेन देशातील आहेत. या मालमत्ता मुख्य आरोपी पावेल प्रोजोरोव यांच्या मालकीच्या आहेत. ते याप्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचा दावा ईडीकडून करण्यात येत आहे. यापूर्वी १ ऑक्टोबरला ईडीने आरोपपत्र दाखल केले होते.