मुंबई : मालेगाव येथील १०० कोटींच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य सूत्रधार मेहमूद भागड ऊर्फ चॅलेंजर किंग ऊर्फ एमडी असल्याचे सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) तपासात निष्पन्न झाले आहे. ३५ वर्षीय भागडने मालेगाव आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी आरोपी सिराज मोहम्मदच्या अटकेनंतर परदेशात पलायन केल्याचा संशय आहे. सिराजवर १४ बँक खाती उघडून त्यावर कोट्यावधी रुपये जमा केले. त्यानंतर ती रक्कम इतर २१ खात्यांमध्ये हस्तांतर करण्यात आल्याचा संशय आहे. या रकमेचा निवडणूकीसाठी गैरवापर झाल्याचा संशय असून त्याबाबत ईडी तपास करत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ईडीच्या तपासानुसार, गरीबांच्या व्यक्तींच्या नावावर मालेगाव येथील दोन बँखांमध्ये १४ बँक खाती उघडण्यात आली होती. त्यातील चार कोटी रुपये दुबईतील पाच कंपन्यांना हस्तांतरित केल्याचे आढळले. या पाच कंपन्या आरोपी सिराज मोहम्मद सिराजशी संबंधीत असल्याचे दाखवण्यात आले आहे. पण प्रत्यक्षात भागड त्या कंपन्या नियंत्रीत करत असल्याचा ईडीला संशय आहे.

हेही वाचा…कोकण रेल्वेवरील दुहेरीकरणाचा तूर्तास प्रस्ताव नाही

भागडने याप्रकरणातील अटक आरोपी नागानी अक्रम मोहम्मद शफी आणि वसीम वलीमोहम्मद भेसाणिया यांन प्रति महिना ३५ हजार रुपये पगारावर नोकरीवर ठेवले होते. या दोघांनी अल्प कालावधीत नवी मुंबई, नाशिक, सुरत, अहमदाबाद, उत्तर प्रदेश, राजकोट, छत्तीसगड आणि दिल्लीसारख्या शहरांमध्ये अनेक एकल मालकी कंपन्या स्थापन केल्या.

शफीच्या चौकशीतून उघड झाले की, भगड हा या संपूर्ण प्रकरणातील सूत्रधार असल्याचे समजले आहे. सिराजच्या अटकेनंतर भागडने शफीला देश सोडून पळून जाण्याचा सल्ला दिला होता. भागडच्या सूचनेनुसार, शफीने देश सोडण्याचा प्रयत्न केला, मात्र अहमदाबाद विमानतळावर पकडला गेला.

अटक आरोपी शफी व भेसाणिया यांनी भगडच्या आदेशावर तिनशेहून अधिक बँक खाती व अनेक बनावट कंपन्या स्थापन केल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले आहे. आरोपींनी २०० हून अधिक बँक खाती बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांसाठी वापरली होती. या खात्यांवर जमा झालेली रक्कम अहमदाबाद, मुंबई, व सुरत येथील हवाला ऑपरेटर्सच्या मदतीने इतरत्र वळवण्यात आले.

हेही वाचा…पर्यावरणाचे नियम धाब्यावर, कांदिवलीतील विकासकाला पुन्हा नोटीस

मालेगाव येथील सिराज अहमद हारून मेमन याने नाशिकमधील दोन बँकांमध्ये सुमारे १४ बँक खाती उघडली होती. त्यातील गैरव्यवहाराप्रकरणी मेमनला स्थानिक पोलिसांनी अटक केली होती. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या प्रकरणाला ‘वोट जिहाद फंडिंग’ गैरव्यवहार असे म्हटले आहे. याप्रकरणी शुक्रवारी ईडीने मुंबई व अहमदाबाद येथील सात ठिकाणी छापे टाकले. त्यात मुंबईतील अंगडिया व्यवसायिकाशी संबंधीत एका ठिकाणाचा समावेश आहे. या कारवाईत १३ कोटी ५० लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. तपासानुसार नागाणी अक्रम मोहम्मद शफी व वासिम वलीमोहम्मद भेसानिया यांनी बनावट खात्यांमधून मोठ्या प्रमाणत रक्कम काढण्याचे समजले. ते दोघे मेहमूद भागड ऊर्फ चॅलेंजर किंग ऊर्फ एमडी याच्या सांगण्यावरून काम करत होते, असे चौकशीत सांगितले. त्यानुसार नागाणी अक्रम शफी व वासिम भेसानिया यांना ईडीने शुक्रवारी अटक केली होती.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai ed investigation reveals mehmood bhagad is mastermind behind rs 100 crore malegaon scam mumbai print news sud 02