मुंबई : कांदिवली पूर्व येथील एका शाळेत शुक्रवारी खेळाचा तास सुरू असताना आठ वर्षांचा मुलगा आकडी (फिट्स) आल्यामुळे खाली कोसळला. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. समता नगर पोलिसांनी याप्रकरणी अपमृत्यूची नोंद केली असून शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा – ठाण्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांना निलंबनाबाबत तूर्त दिलासा नाही, राज्य सरकारला राक्षे यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश

हेही वाचा – मुंबई : पर्युषण काळात एक दिवस देवनार पशुवधगृह बंद, पालिका प्रशासनाचे परिपत्रक जारी

कांदिवली पूर्व येथील एका शाळेतील इयत्ता तिसरीमध्ये शिवांश झा शिक्षण घेत होता. तो कांदिवलीत आपल्या पालकांसोबत राहत होता. शुक्रवारी दुपारी ३ च्या सुमारास त्यांच्या वर्गात खेळाचा तास सुरू होता. त्यासाठी विद्यार्थ्यांना खाली नेण्यात आले. तेथे उडी मारताना तो खाली कोसळला. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाच्या तपासणीत झा याला आकडी येऊन तो खाली कोसळत असल्याचे निदर्शनास आले. शाळेतील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबाला याबाबत माहिती दिली आणि तात्काळ जवळच्या श्रीजी रुग्णालयात नेले. रुग्णालयाने त्यांच्या कुटुंबीयांना मुलाची स्थिती गंभीर असल्याचे सांगितले. नंतर त्याला कांदिवलीतील बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात हलविण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.