प्रवाशांना थेट स्थानकात पोहोचता यावे यासाठी एलीव्हेटेड डेक, होम प्लॅटफॉर्म याबरोबरच पादचारी पुलासह विविध सुविधांची रेलचेल पश्चिम रेल्वेवरील खार स्थानकात प्रवाशांना मिळणार आहे. या स्थानकात सध्या एलीव्हेटेड डेकचे काम सुरु असून ते ५० टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे उर्वरित दुसऱ्या टप्प्यातील विविध कामांना गती देण्यासाठी एमआरव्हिसीने निविदा काढली असून ती भरण्यासाठी १३ डिसेंबर २०२२ ही अंतिम मुदत आहे. मार्च २०२४ पर्यंत ही सर्व कामे पूर्ण करण्यात येणार आहेत.
पश्चिम रेल्वेवरील खार स्थानक हे गजबजलेले स्थानक म्हणूनच ओळखले जाते. धीम्या लोकल गाड्या या स्थानकात थांबतात, तसेच हार्बर मार्गावरील लोकलही थांबतात. त्यामुळे या स्थानकातून प्रवास करणाऱ्यांची संख्या इतर स्थानकांच्या तुलनेत अधिक आहे. रोज ५२ हजारपेक्षा जास्त प्रवासी या स्थानकातून प्रवास करतात. पूर्व आणि पश्चिम दिशेनेहून खार स्थानकात प्रवेश करण्यासाठी पादचारी पुलाशिवाय पर्याय नाही. तसेच स्थानकच्या दोन्ही बाजूला फेरीवाले, वाहनांची गर्दी असून त्यामुळे स्थानकापर्यंत पोहोचणे प्रवाशांना कठीण जाते. अशा खार स्थानकातील प्रवास सुटसुटीत होण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या मदतीने एमआरव्हीसीने सुविधांची भर घालण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा >>>…मला भीती आहे किशोरी पेडणेकर प्रकरणात ‘या’ सगळ्यांचा मनसुख हिरेन होऊ नये – किरीट सोमय्या
एमयुटीपी ३ ए अंतर्गंत १९ स्थानकांचा विकास केला जाणार आहे. यातील प्रथम एकट्या खार स्थानकाचे प्रायोगिक तत्वावर काम हाती घेतले आहे. मे २०२२ पासून खार स्थानकाच्या कामाला सुरुवात झाली आहे. या स्थानकाच्या पश्चिमेला दहा मीटर रुंदीचा डेक तयार करण्यात येणार असून त्यावर तिकीट खिडकीही असेल. याशिवाय २२.५० मीटर रुंदीचा आणखी एक डेक स्थानकातील सर्व पादचारी पुलांना जोडला जाणार आहे. तेथून प्रवाशांना स्थानकात पोहोचता येईल. खार स्थानकाच्या पश्चिम दिशेला नवीन होम प्लॅटफाॅर्मही तयार करण्यात येणार आहे. तेथून प्रवाशांना स्थानकात थेट जाता येणार असल्याचे एमआरव्हिसीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचा >>>“उद्धव ठाकरेंना भाजपाबरोबर युती…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला खुलासा
एलीव्हेटेड डेकच्या कामाला सुरुवात झाली असून ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित डेकच्या कामासह स्थानकातील पादचारी पुलावरुन दुसऱ्या पुलावर जातानाच थेट फलाटावरही जाता यावे यासाठी स्थानकातील सर्व पादचारी पूल तसेच आकाशमार्गिका परस्परांना जोडणे, चार सरकत्या जिन्यांची उभारणी, एक पादचारी पूल, तीन उद्वाहक असे सर्व उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या कामांसाठी 3 नोव्हेंबरला निविदा काढण्यात आल्या आहेत. निविदा भरण्याची 13 डिसेंबर २०२२ ही अंतिम मुदत आहे.