मुंबई : ‘दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’, ‘दहिसर – गुंदवली मेट्रो ७’ आणि चेंबूर – जेकब सर्कल मोनोरेलसाठी स्वतंत्र पावसाळी आपत्कालीन नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. दोन्ही मेट्रो मार्गिका आणि मोनोरेलच्या संचलन, तसेच देखभालीची जबाबदारी असलेल्या महामुंबई मेट्रो संचलन महामंडळाने (एमएमएमओसीएल) हा कक्ष कार्यान्वित केला आहे. तसेच पावसाळ्याच्या दृष्टीने मेट्रो, मोनोच्या देखभाल-दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. तर पावसाळ्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत.
पावसाळ्यात मेट्रो २ अ, मेट्रो ७ आणि मोनोची सेवा सुरळीत रहावी, पावसाळ्यात अडचणी आल्यास तात्काळ त्याचे निवारण व्हावे यासाठी हा कक्ष कार्यरत असणार आहे. हा कक्ष २४ तास कार्यरत असणार असून हा कक्ष मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाशी संलग्न असणार आहे. मेट्रो आणि मोनोच्या प्रवाशांना आपत्कालीन परिस्थितीत हेल्पलाईन क्रमांक १८००८८९०५०५/ १८००८८९०८०८ वर संपर्क साधावा. तसेच नागरिकांना मोनोरेलच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाशी मोबाइल क्रमांक ८४५२९०५४३४ वरून संपर्क साधता येईल.
हेही वाचा – मुंबई : स्वच्छता मोहिमेत १५७ मेट्रिक टन राडारोडा व ७४ मेट्रिक टन कचऱ्याचे संकलन
पावसात हवेच्या वेगाचे निरीक्षण करून मेट्रो कार्यान्वयनाचे अचूक नियोजन करण्याच्या दृष्टीने मेट्रो २ अ आणि ७ च्या दहा मेट्रो स्थानकांवर ॲनिमोमीटर बसविण्यात आले आहेत. हे ॲनिमोमीटर वाऱ्याचा वेग अचूकपणे मोजत असल्याने रिअल-टाइम मॉनिटरिंग करण्यासाठी ते उपयुक्त ठरणार आहे. एमएमएमओसीएलच्या कक्षात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मेट्रोची अखंड सेवा सुनिश्चित करण्यासाठी आणि प्रतिकूल हवामानामुळे उद्भवणारे कोणतेही धोके कमी करण्यासाठी मेट्रोचे कुशल अधिकारी – कामगांरांचे पथक २४ तास तीन पाळ्यांमध्ये कार्यरत राहणार आहे.
हेही वाचा – जनऔषधी केंद्रांमध्ये कर्करोग, प्रतिजैविके आदींच्या विक्रीला औषध कंपन्यांचा विरोध
मेट्रोच्या प्रवाशांची सुरक्षितता अबाधित राखण्याच्या अनुषंगाने एमएमएमओसीएलने प्रत्येक मेट्रो स्थानकावर ६४ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. तर मेट्रो – मोनो स्थानक आणि डेपोमधील पावसाळापूर्व देखभाल दुरुस्तीची सर्व कामे पूर्ण करण्यात आली आहेत. मेट्रो आणि मोनोरेलच्या सेवांमध्ये व्यत्यय आणणारे तसेच धोकादायक ठरणारे जाहिरात फलक, अन्य कोणतेही संभाव्य अडथळे शोधण्यासाठी मेट्रो आणि मोनो मार्गिकेच्या संपूर्ण संरेखनची सखोल तपासणी एमएमएमओसीएने केली आहे. याव्यतिरिक्त, आवश्यक त्या ठिकाणी झाडाच्या फांद्यादेखील छाटण्यात येत आहेत.